उपसंपादक – सतीश मिरपगार
अहिल्यानगर-नगर तालुक्यासह परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी कामरंगाव येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला होता.

ती घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी आणखी एक हृदयद्रावक प्रसंग घडला – खारेकर्जुने येथे पाच वर्षांची रियांका सुनील पवार हिला बिबट्याने घरच्यांच्या डोळ्यांसमोर उचलून नेले.सायंकाळी साधारण साडेसहा वाजले असतील. थंडीचा पारा खाली गेल्याने शेतातील वस्तीवर काही कुटुंबे शेकोटीभोवती बसून ऊब घेत होती. त्याच वेळी रियांका जवळच खेळत होती. अचानक शेजारच्या तुरीच्या शेतातून एक बिबट्या दबक्या पावलांनी बाहेर आला आणि क्षणात त्या निरागस बालिकेला उचलून पळाला. कुटुंबीयांनी आरडाओरड केली, पाठलागही केला, पण बिबट्या दृष्टीआड झाला.घटनेची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी वस्तीवर धाव घेतली, शोधमोहीम राबवली, मात्र रात्री उशिरापर्यंत त्या चिमुरडीचा काही पत्ता लागला नव्हता. पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन परिसरात शोध घेत आहेत.या सलग दोन घटनांमुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक वस्तीवर आता बिबट्याच्या छायेतून अस्वस्थता आणि भीती पसरली आहे.
