February 21, 2026

पाथर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शहरात उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असला, तरी प्रशासनाने उमेदवारांच्या सोयीसाठी सुरू केलेली ‘एक खिडकी योजना’ पहिल्याच दिवशी कोलमडली.

नव्या पालिका इमारतीत या योजनेअंतर्गत उमेदवारी अर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची सोय करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आवश्यक असणारी पाणीपट्टी, घरपट्टी, विविध परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे आणि उतारे यांसह अनेक कागदपत्रे मिळवण्यासाठी आज दिवसभर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पालिका इमारतीत धावपळ केली. परंतु संबंधित विभागांकडून कागदपत्रे मिळवताना उमेदवारांचा अक्षरशः ऊर फुटला. ‘एक खिडकी’ योजनेच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे मिळतील, असे प्रशासनाने सांगितले होते; पण अनेकांना वारंवार वेगवेगळ्या काउंटरवर चकरा माराव्या लागल्या. परिणामी, दिवसअखेर एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.अर्ज भरण्याचा आज पहिलाच दिवस होता, त्यामुळे उत्साह अपेक्षित होता. मात्र आवश्यक कागदपत्रांसाठी लागणारा वेळ आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे उमेदवार निराश झाले. अनेकांनी सांगितले की, ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठीदेखील मार्गदर्शन मिळाले नाही.मुख्याधिकारी सपना वासावा यांनी म्हटले की, मंगळवार दिनांक ११ पासून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना कागदपत्रे सहज मिळतील आणि अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पडेल.दुसरीकडे, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दुसरा विषयही चर्चेत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मध्यरात्री अनावरण झाल्याने राजकारणाला नवा रंग मिळाला आहे. आठ वर्षांपूर्वी ठरवलेल्या जॉगिंग पार्क या ठिकाणी पुतळा बसवण्याचा निर्णय मूळ स्व. आमदार राजीव राजळे यांच्या सूचनेवर झाला होता. या ठिकाणावरून भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी यापूर्वीच आक्षेप घेतला होता.मात्र रविवारी मध्यरात्रीनंतर शहराच्या हद्दीवर पुतळा दाखल होताच आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या रूपाने तो जॉगिंग पार्कपर्यंत नेला. फटाके, घोषणाबाजी आणि फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी नेत्यांप्रती निष्ठा प्रकट केली. क्रेनच्या सहाय्याने पुतळा चबुतऱ्यावर बसवला गेला आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. आश्चर्य म्हणजे हा कार्यक्रम दिवसाढवळ्या होणार असतानाच शेवटच्या क्षणी मध्यरात्री पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की, हा निर्णय राजकीय भावनांचा मुद्दा बनवण्यासाठी घेतला गेला असावा. नागनाथ गरजे आणि सुनील पाखरे यांनी सांगितले की, “या संपूर्ण प्रकरणाकडे पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही समविचारी कार्यकर्त्यांसह ॲडव्होकेट दिनकर पालवे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच त्यांची भेट घेऊ.”अनावरणावेळी उपस्थित एका कार्यकर्त्याने पंकजा मुंडे यांना थेट व्हिडिओ कॉल करून पुतळा दाखवला. त्यांनी कार्यकर्त्यांचे शुभेच्छा देत अभिनंदन केले, मात्र त्यांनी सांगितले की, “मला घाई आहे, उद्या लवकर निघायचं आहे. पुतळा नंतर येऊन बघते.” हा संवाद आणि त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावाबद्दल मात्र कार्यकर्त्यांनी मौन बाळगले.पालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर घडलेल्या या दोन घटनांमुळे — एकीकडे ‘एक खिडकी योजना’ बारगळल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर दुसरीकडे मध्यरात्रीच्या पुतळा अनावरणामुळे भाजपमध्येच भिन्नमतांची चर्चा सुरू झाली आहे. या घटनांमुळे पाथर्डीतील राजकारण अधिक तापले आहे आणि पुढील काही दिवसांत कोणत्या नव्या समीकरणांना जन्म मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!