April 14, 2026

पाथर्डी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकीकडे उत्साहपूर्ण वातावरण, भव्य मिरवणुका आणि जनसागर पाहायला मिळाला;

मात्र दुसरीकडे शहरभर वाढलेल्या अनधिकृत फ्लेक्स संस्कृतीवर आमदार मोनिका राजळे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले.महापुरुष आणि राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांमधून समाजाला प्रेरणा, ऊर्जा आणि दिशा मिळावी या उद्देशाने पुतळे उभारले जातात. परंतु सध्या या पवित्र स्थळांभोवती फ्लेक्स, बॅनर आणि अतिक्रमणांचा वेढा पडत चालल्याचे चित्र चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या. पालिका आणि पोलीस प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याने आता थेट कारवाई करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“आपण सण-उत्सव केवळ डीजे वाजवून नाचण्यासाठी साजरे करतो का? महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज अशी परिस्थिती झाली आहे की उत्साही फ्लेक्सवाल्यांनी महापुरुषांचे पुतळेच झाकून टाकले आहेत, हे अत्यंत वेदनादायक आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.आंबेडकर स्मारकात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अॅड. प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, तिलक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शहरातून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध शाळा, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. मात्र कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्यामुळे एकतेचा अभाव जाणवल्याची खंत व्यक्त करत सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला.गेल्या काही दिवसांत शहरातील प्रत्येक मोकळ्या जागेवर फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. विजेचे खांब, रस्त्यांचे दुभाजक, शासकीय इमारतींचे कंपाउंड, मोठ्या इमारती—सर्वत्र फ्लेक्सचा सुळसुळाट झाल्याने शहराचा चेहरामोहरा बिघडला आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांचे फलक झाकले जात असून सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे. पालिकेचा महसूलही यामुळे बुडत असल्याचे निदर्शनास आले.

“फ्लेक्स लावण्यासाठी ठराविक नियमावली असावी, परवानगीशिवाय फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी आणि ठराविक कालावधीनंतर ते हटवणे बंधनकारक करावे,” असे निर्देश देत त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले असले तरी आज त्या ठिकाणी फळ विक्रेते, भाजीविक्रेते आणि फ्लेक्समुळे पुतळाच दिसेनासा झाला आहे. “आपणच पुतळे उभारायचे आणि आपणच त्यांचा अवमान करायचा, हे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, “कोणत्याही नेत्यांचे वाढदिवसाचे बोर्ड लावू नका. लावलेले फ्लेक्स लवकर काढा आणि इतरांनाही संधी द्या. आज इतके मोठे फ्लेक्स लावले जातात की छत्रपतींचे पुतळे आणि शासकीय इमारतीदेखील झाकल्या जातात. आपण त्या महापुरुषांपेक्षा मोठे आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करावा,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनीही यावर भाष्य करत, “ज्यांच्या आशीर्वादाने आपण मोठे झालो, त्यांचाच फोटो लहान आणि स्वतःचा मोठा ठेवणे योग्य नाही,” असे सूचक वक्तव्य केले.दरम्यान, शहरातील फ्लेक्स संस्कृतीवरून राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत असून पालिकेच्या बैठकीत यावरून मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे.कार्यक्रमाच्या शेवटी आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. दिगंबर गाडे यांनी डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी केली. सूत्रसंचालन महेश अंगरखे यांनी केले, तर विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.एकूणच, “कायद्याने वागाल तर फायद्यात राहाल” हा स्पष्ट संदेश देत पाथर्डी शहरात फ्लेक्स हटाव मोहिमेची नांदी झाली असून प्रशासन आता कितपत प्रभावी कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📢 तुमचा एक मेसेज बदलू शकतो संपूर्ण चित्र!
✍️ संपादक : सचिन दिनकर | उपसंपादक : सतीश मिरपगार📲 WhatsApp करा : 8605255255 / 9421555567
🔥 “आवाज जनतेचा… आता थेट तुमच्याकडून!

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!