सगळं दुःख पचवून टिकली… आमदार झाली! भगवानगडावर मोनिका राजळे यांचं कौतुक; नव्या राजकीय समीकरणांची चाहूल
श्रीक्षेत्र भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आमदार मोनिका राजळे यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करत महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. “सगळं दुःख पचवून ती टिकली आणि दोन वेळा आमदार झाली,” अशा शब्दांत त्यांनी राजळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उहापोह करत आगामी वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.

या सोहळ्यातील भाषणांमधून केवळ कौतुकच नव्हे, तर भविष्यातील राजकीय संकेतही स्पष्ट दिसून आले. प्रताप ढाकणे यांच्याबाबतही “दुर्लक्ष करून चालणार नाही” असा सूचक संदेश देत आगामी समीकरणांमध्ये त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळाले.दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे अनुपस्थित असल्या तरी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वतीने दर्शन घेतल्याचे जाहीर करताच व्यासपीठावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. भगवानगड, गोपीनाथ गड आणि स्थानिक राजकारणातील बदलती नाती या पार्श्वभूमीवर हा सप्ताह केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा ठरला.आमदार राजळे यांनीही आपल्या भाषणातून आत्मविश्वासासोबतच सावध भूमिका घेत सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. गडांच्या माध्यमातून जातीयतेला खतपाणी न घालण्याचा संदेश देताना नेतृत्वाची संयमी भूमिका अधोरेखित झाली.या सप्ताहातून भगवानगडाकडून झालेल्या जाहीर कौतुकामुळे राजळे समर्थकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, आगामी काळात नव्या राजकीय घडामोडींची चाहूल अधिक स्पष्टपणे जाणवू लागली आहे.
