प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी – “बिबट्या मोठा, की जीव मोठा” या प्रश्नाचे उत्तर माणसाने पोटा पुढे सर्वच छोटे असे देत वनविभागाने पिंजऱ्यामध्ये बिबट्यासाठी ठेवलेले भक्ष भक्षण करण्यासाठी चोरट्यांची नजर आता पिंजऱ्यावर सुद्धा गेली आहे.

करंजी परिसरातील बिबट्या पकडण्यासाठी ठेवलेल्या पिंजऱ्यामधील कोंबड्या चोरीला जात असल्याने वनविभागाचे कर्मचारी सुद्धा हतबल झाले आहेत. तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र बिबट्याची दहशत पसरली आहे. गर्भगिरी डोंगर परिसरातील गावांमध्ये गेल्या महिन्यात विविध गावच्या ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. लोकांच्या तक्रारीवरून वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत. यामध्ये कोंबड्या ठेवल्या जातात. शेळ्या बोकड असे प्राणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी होते. वनविभागाकडे अशी तरतूद नाही. त्यामुळे दुधाची तहान ताकावर याप्रमाणे बॉयलर कोंबड्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसात अशा कोंबड्यांकडे बिबट्या फिरकला नाही, याचा अंदाज येत पहाटेच्या वेळी रानावनात फिरणारे पिंजऱ्याकडे डोकून बघतात. त्यामध्ये बिबट्या अडकला नाही, याची खात्री करतात. मग अलगदपणे बिबट्यासाठी मांडलेले भक्ष स्वतःभक्षण करण्यासाठी चोरून घेऊन जातात. विविध पिंजऱ्यांमधील कोंबड्या चोरण्यासाठी चोरट्यांना सुद्धा चटक लागली आहे. आता बिबट्यावर नजर ठेवायची की चोरट्यांवर असा नवा प्रश्न वनविभागाच्या कर्मचाऱ्यांपुढे आला आहे. तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाकडे तेरा पिंजरे उपलब्ध आहेत. डोंगर परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे व सर्वच कर्मचारी सर्व गावांमध्ये जाऊन बिबट्याच्या संदर्भात जनजागृती व प्रशिक्षण देत आहेत. यामध्ये बबन मंचरे, वनपाल अशोक शर्माळे, वनरक्षक मनीषा शिरसाठ, आरती ढाकणे
यासह मिरी, चिचोंडी, कोल्हार, जवखेडे, कामत शिंगवे , केशवशिंगवे, जवखेडे खालसा, जवखेडे दुमाला, हनुमान टाकळी, कोल्हार, शिराळ, चिचोंडी, मोहरी अशा पट्ट्यात कर्मचारी गस्त घालत आहेत.
वनविभागाने पिंजऱ्याच्या परिसरात विशेष लक्ष केंद्रित करून चोरटे अगोदर पकडू असा निर्धार केला आहे. दरम्यान करंजी परिसरात आज पहाटे काही लोकांना बिबट्या दिसला ही माहिती समजताच वनपाल अशोक शर्माळे यांच्या सह निरीक्षक मनीषा शिरसाट, आरती ढाकणे या दोन जिगरबाज महिला अधिकाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात व कडाक्याच्या थंडीत घटनास्थळी येऊन कोल्हेवाडी परिसर पिंजून काढत आपले कर्तव्य पार पाडत तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला. या जिगरबाज कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांचा गौरव केला.
