पाथर्डी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी_शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मोहटादेवी यात्रेकरूंसाठी यंदा एसटी प्रशासनाने विशेष शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मोहटादेवी फाट्यापासून देवी गडापर्यंत फक्त एसटी बसेसना प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे.

यात्रेकरूंच्या सोयीसाठी विभाग नियंत्रकांनी वाढीव बसेस मंजूर केल्या असून प्रवाशांच्या संख्येनुसार या बसेस अहोरात्र धावणार असल्याची माहिती आगार प्रमुख अरिफ पटेल यांनी दिली.यापूर्वी भाविकांना भक्तनिवासापासून गडापर्यंत पायी चढाई करावी लागत होती. मात्र यंदा भाविकांची वाहने कमानीबाहेर पार्क केल्यानंतर एसटीच्या शटल बसेस मोहटादेवी फाट्यापासून थेट देवी गडाच्या पायथ्यापर्यंत प्रवाशांना पोहोचवतील. दर्शनानंतर परतीच्या प्रवासासाठीही निलगिरी गेटपासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बसेसची सोय करण्यात आली आहे. यामुळे निम्म्या अंतरापर्यंत भाविकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक मिळणार आहे.पाथर्डीची दोन्ही बसस्थानके, देवी गडाच्या पायथ्यावरील बस शेड आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळील नव्या शटल स्टँडवर पुरेसे कर्मचारी नेमून बसेसची त्वरित उपलब्धता ठेवण्यात आली आहे.

गर्दीच्या संख्येनुसार तातडीने अतिरिक्त बसेस चालविण्याबरोबरच आवश्यकतेनुसार लांब पल्ल्याच्या व ग्रामीण मार्गावरील बसेसही यात्रेसाठी वळविण्यात येतील.तालुक्यातील गावांनी ग्रुप बुकिंगद्वारे बसची मागणी केल्यास, उपलब्धतेनुसार विशेष बससेवा देण्याचाही एसटी प्रशासनाचा प्रयत्न असेल, असे पटेल यांनी सांगितले. वणी, तुळजापूर, माहूरगड यांसारख्या प्रसिद्ध यात्रांच्या धर्तीवर यंदा मोहटादेवी यात्रेचा अल्पावधीत आराखडा तयार करून एसटी प्रशासनाने सर्व नियोजन पूर्ण केले असून, भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
