पाथर्डी प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी_शारदीय नवरात्रोत्सव काळात पाथर्डी शहर व परिसरात होणाऱ्या मोठ्या गर्दीचा विचार करता प्रमुख दळणवळण रस्त्यांवर कमानी, फ्लेक्स बोर्ड व जाहिराती लावण्यासाठी आता नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

कोणतीही अनधिकृत उभारणी टाळण्यासाठी याबाबत तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली.
यात्रा कालावधीत भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अनेक ठिकाणी विनापरवाना कमानी उभारणे, जागा दिसेल तिथे फ्लेक्स बोर्ड व जाहिराती लावणे याचे प्रमाण वाढते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची तसेच अपघाताची शक्यता वाढते. “एखाद्या वाहनाला धक्का बसला, बोर्ड किंवा कमान कोसळली, वाऱ्यामुळे वीजवाहक तुटले तर तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,” असे पुजारी यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने सांगितले की, कमानी उभारणीसाठीही ठरावीक नियमावली आहे. त्यानुसारच परवानगी घेऊनच फ्लेक्स बोर्ड, कमानी अथवा जाहिराती लावाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
भाविक, व्यावसायिक, राजकीय पक्ष व मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे आणि नवरात्रोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहनही पोलिस निरीक्षक पुजारी यांनी केले.
