पारनेर_तालुक्यात भीतीचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निरागस बालकाला बिबट्याच्या तावडीत गमवावे लागल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास सिद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती ॲग्रो परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली.बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील लहानगा अमन पन्नूलाल खोटे (वय ३) घराबाहेर लघुशंकेसाठी आल्यावर, आईच्या डोळ्यांसमोरच बिबट्याने झडप घालून त्याला जंगलाच्या दिशेने ओढून नेले. पाहता पाहता घराघरांत किंकाळ्या फुटल्या आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिकांनी तातडीने वनविभागाला कळवले. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या शोधमोहीमेनंतर, मंगळवारी सकाळी आठ वाजता सिद्धेश्वरवाडी शिवारातील झुडपात अमनचा मृतदेह सापडला. वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कारले, साहेबराव भालेकर आणि अंकराज जाधव यांनी स्थानिकांच्या मदतीने ही मोहीम राबवली.

परिसरात आता पिंजरे लावून गस्त वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच तालुक्यात २ सप्टेंबर रोजी कळस येथेही अशाच प्रकारे एका बालकाचा बळी गेला होता. अवघ्या आठवड्यातील दोन घटना ग्रामस्थांच्या मनात तीव्र भीती निर्माण करत आहेत. पाळीव प्राण्यांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे दहशत आणखी वाढली आहे.
वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. नागरिकांना रात्री खबरदारी घेण्याचे, तसेच मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तपास सुरू असून परिसरात सतर्कतेचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
