संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात रविवारी दुपारी घडलेली घटना पाहून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दाम्पत्यातील सततच्या वादाला कंटाळून पतीने पत्नीचा निर्दयी खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत दाम्पत्याची नावे आहेत – कुलदीप सुनील अडांगळे (३५) आणि वैष्णवी संजय खांबेकर (२२). काही महिन्यांपूर्वी हे दाम्पत्य मुंबईत राहत होते. मात्र सततच्या भांडणांमुळे वैष्णवीने माहेरी संगमनेरला परत येण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी ती माहेरी आली होती. यानंतर केवळ तीन दिवसांपूर्वीच कुलदीपही संगमनेरला आला आणि पत्नीला घेऊन इंदिरानगरमधील घरात राहायला गेला.रविवारी दुपारी या दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. रागाच्या भरात कुलदीपने पत्नीला मारहाण करून गळा आवळत तिचा खून केला. पत्नीचा जीव गेल्यानंतर स्वतःच्या आयुष्यावरही पडदा टाकत त्याने पंख्याला गळफास घेतला. या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले.
ही घटना दुपारी पावणे तीनच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरात पसरलेले भीषण दृश्य पाहून परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तथापि, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत. या घटनेनंतर इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र या दुर्दैवी घटनेचीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याआधीच साकूर परिसरात दोन अल्पवयीन चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर केवळ काही दिवसांतच दाम्पत्याच्या दुर्दैवी मृत्यूने संगमनेर तालुका पुन्हा हादरून गेला आहे.
