February 19, 2026

पाथर्डी शहरातील राज्य परिवहन आगारात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

सन १९७९ साली आगार सुरू झाल्यापासून एक परंपरा जोपासली गेली आहे — मोहटा देवी यात्रेनंतर देवीची प्रतिमा व साडी-चोळी सजवून एसटीवरून मिरवणूक काढण्याची. ही अनोखी परंपरा आजही कायम राखली जात असून, यंदाही आगार परिसर भक्तिभावाने निनादला. नवरात्र यात्रा सुखरूप पार पडल्याच्या आनंदात मोहटा देवीची प्रतिमा व साडी-चोळी आकर्षक पद्धतीने सजवून एसटी बसवर मिरवणुकीसाठी ठेवण्यात आली. मंगल वाद्यांच्या गजरात, टाळ-ढोलाच्या निनादात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होत देवीला भावपूर्ण नमस्कार अर्पण केला.

मिरवणुकीनंतर देवीसमोर आरती करण्यात आली.या प्रसंगी पाथर्डी आगार कामगार संघटनेचे सचिव बाळासाहेब सोनटक्के, अध्यक्ष अंबादास शिरसाठ, सुनील कर्नावट, किरण गारुडकर, विठ्ठल कंठाळे, वाहतूक निरीक्षक गोवर्धन दहिफळे, नारायण (मामा) कंठाळे तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देवीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने आगारात उत्साह आणि भक्तीचा मिलाफ पाहायला मिळाला. या परंपरेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळाले. पाथर्डी आगारातील ही “मोहटा देवी मिरवणूक” आता केवळ धार्मिक सोहळा राहिलेली नाही, तर कर्मचाऱ्यांच्या ऐक्याचे आणि परंपरेच्या जपणुकीचे प्रतीक बनली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!