पाथर्डी तालुक्यातील हत्राळ गावात शेतकऱ्याला दारू पाजून, अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून तब्बल ८० गुंठे शेतजमीन बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेतकरी मनोहर बाबासाहेब क्षीरसागर (३६) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हत्राळमधील राजयोग हॉटेलचा मालक कालिदास दत्तात्रय टकले (३०) याने कपटी डाव रचून ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.
२७ मे रोजी सकाळी क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून राजयोग हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी हॉटेल मालकाने त्यांना जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने त्यांना तिसगाव येथे नेण्यात आले. परत आल्यानंतर क्षीरसागर पूर्णपणे नशेत असल्याने टकले याने त्यांना हॉटेलमध्ये झोपवले. याचवेळी, एका महिलेसोबत त्यांचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचे सांगून तो व्हिडीओ गावात व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
या भीतीमुळे घाबरलेल्या क्षीरसागर यांना थेट दुय्यम निबंधक कार्यालय, पाथर्डी येथे नेण्यात आले. तिथे संदीप साळवे (रा. चितळी) आणि एक अनोळखी इसम यांच्या उपस्थितीत टकले याने काही कागदपत्रांवर सही करून घेतली. त्यावेळी क्षीरसागर इतक्या नशेत होते की, नेमकं काय सही घेतलं जातंय याची त्यांना काही कल्पनाच नव्हती.
काही दिवसांनी, ४ जून रोजी क्षीरसागर यांचा लहान भाऊ सचिन, जो सैन्यदलात सिक्कीम येथे कार्यरत आहे, त्याने फोनवर धक्कादायक माहिती दिली. ई-चावडी संकेतस्थळावर क्षीरसागर यांची ८० गुंठे शेतजमीन (गट क्रमांक २२३/१, शिवार हत्राळ) विक्रीखताद्वारे कालिदास टकले यांच्या नावावर झाल्याची नोंद दिसत होती.

यानंतर क्षीरसागर यांनी चौकशी केली असता खरेदी दस्त क्रमांक २१२३/२०२५ नुसार ही जमीन टकले यांच्या नावावर झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, या विक्रीवेळी क्षीरसागर यांना कोणताही मोबदला मिळालाच नव्हता. हे समोर आल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी कार्यालयात हरकत अर्ज दाखल केला.
१७ जुलै रोजी मंडळ अधिकार्यांनी सुनावणीदरम्यान क्षीरसागर यांची बाजू ग्राह्य धरली आणि टकले याने धमकी, फसवणूक आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर करून जमिनीची खरेदी केल्याचे स्पष्ट मान्य केले. त्यामुळे सदर नोंदणी सरळ नामंजूर करण्यात आली.
यामुळे टकलेचा गुन्हा उघडकीस आला असून, शेतकरी कुटुंबाला मोठ्या संकटातून दिलासा मिळाला आहे. मात्र, दारू पाजून आणि अश्लील व्हिडीओच्या भीतीने शेतकऱ्याला फसवून जमीन हडपण्याच्या या प्रकाराने नगर जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर करीत आहेत.
