February 21, 2026

गणेशोत्सवात सजावटीसोबतच शिस्त व समाजसेवेलाही पुरस्कार

पाथर्डी –गणेशोत्सव म्हटला की भक्ती, उत्साह, सजावट आणि सांस्कृतिक विविधतेचा संगम अनुभवायला मिळतो. मात्र या सणाचा खरा आत्मा म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि शिस्तीचे भान. याच उद्देशाने यंदा पाथर्डी पोलीस स्टेशनतर्फे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्याl या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तालुक्यातील तब्बल २३१ गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पाच मंडळांची अंतिम निवड होणार असून, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या मंडळांना ट्रॉफी व रोख पारितोषिक, तर उर्वरित दोन मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा फक्त सजावट, प्रकाशयोजना किंवा देखाव्यावर आधारित नसून वर्षभर गणेश मंडळांनी केलेले सामाजिक उपक्रम, मिरवणुकीतील शिस्त, डीजे-मुक्त वातावरण, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, सामाजिक सलोखा वाढविण्याचे प्रयत्न आणि भाविकांसाठी केलेल्या सोयीसुविधा या निकषांवर मूल्यांकन होणार आहे.

स्पर्धेसाठी वेगळी नोंदणी आवश्यक नसून, समिती सदस्य प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष निरीक्षण करूनच पात्र मंडळांची निवड करतील. या समितीत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष लांडगे यांचा समावेश आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया राबवली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात आणि त्यानंतर मंडळांचे कार्य तपासून निकाल जाहीर केला जाईल. यामध्ये सामाजिक जबाबदारी, लोकजागृती, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिस्तीचे पालन या मुद्द्यांना जास्त महत्त्व दिले जाईल.

पाथर्डी पोलीस प्रशासनाचा हा उपक्रम म्हणजे केवळ स्पर्धा नसून, गणेश मंडळांमध्ये सकारात्मक चळवळ निर्माण करणारे व्यासपीठ आहे. अनेकदा गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी, आवाज प्रदूषण किंवा अनावश्यक दिखावा दिसून येतो. पण या उपक्रमामुळे यंदा “शिस्तबद्ध व जबाबदार गणेशोत्सव” साजरा होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

गणेशभक्तीबरोबरच समाजसेवेची जोड देणारी ही अनोखी संकल्पना पाथर्डीत सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. या उपक्रमातून “सणातही शिस्त, सणातही समाजसेवा” हा संदेश सर्वत्र पोहोचेल आणि इतर तालुक्यांसाठीही हा प्रयोग आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!