February 21, 2026

पाथर्डीत “चांगभले भैरवनाथ महाराज की जय” अशा घणघणीत जयघोषात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत कसबा विभागातील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सवाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.

जिल्ह्यातील दक्षिणमुखी कालभैरवाचे हे एकमेव प्राचीन मंदिर असून, शहराच्या ग्रामदैवत म्हणून शहरवासीयांकडून येथे वर्षभर सेवा आणि उपासना केली जाते.मध्यरात्री बारा वाजता भगवान भैरवनाथांचा जन्मोत्सव विधीवत साजरा करून भक्तांना खिरापतीचा प्रसाद वाटण्यात आला. सकाळी पारंपरिक दुग्धाभिषेकानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.मंदिराचे मुख्य पुजारी दादासाहेब मर्दाने यांनी सांगितले की, कालभैरवाचे हे स्थान अत्यंत प्राचीन असून अलीकडेच गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. भाविकांच्या प्रचंड श्रद्धेमुळे येथे नवस पूर्ण होतात आणि विविध प्रकारचे त्रिविध ताप दूर होतात. कलियुगात शिव उपासनेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, कालभैरव हे शिवाच्या विनाशक शक्तीचे बलाढ्य रूप असून गृहपिडा, वास्तुदोष आणि वाईट विद्येपासून होणारे त्रास दूर होतात.उत्सवाच्या निमित्ताने ‘काशीखंड’ ग्रंथातील भैरवनाथ जन्म आख्यान अध्यायाचे पठण, भजन, सामूहिक पूजन आणि पाळणा सोहळा पार पडला. बालकांकडून फुलांची उधळण करण्यात आली. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. नवमीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.या देवस्थानाविषयी असे मानले जाते की, येथे जयंतीच्या दिवशी दर्शन घेतल्यास वर्षभरातील मनोकामना पूर्ण होतात. या मंदिराला दुसरा मजला नसल्याने भाविक परंपरेनुसार आपल्या घराचे दुमजली बांधकाम करत नाहीत. आज सकाळी वेदशास्त्र संपन्न राहुल वैद्य यांच्या उपस्थितीत दुग्धाभिषेक व महापूजा पार पडली.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!