प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलिसांनी तालुक्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत.

या मोहिमेअंतर्गत आज माळीबाभुळगाव शिवारात मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका संशयितास अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माळीबाभुळगाव येथील सुखदेव धोंडीराम तिजोरे (वय ५४) हा आपल्या राहत्या घरामागे विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पथक तयार करून ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान तिजोरे यांच्या घराच्या भिंतीलगत ठेवलेल्या एका पांढऱ्या ड्रममध्ये २० लिटर तयार दारू सापडली, तर जमिनीत पुरलेल्या दोन बॅरेल्समधून सुमारे ४०० लिटर कच्चे रसायन आढळून आले.दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी आणि इतर साधनसामग्री पोलिसांनी जप्त केली असून सर्व मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आला. या कारवाईत २० लिटर हातभट्टी दारू (किंमत २ हजार रुपये) आणि ४०० लिटर कच्चे रसायन (किंमत २० हजार रुपये) असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल नोंदविण्यात आला आहे. आरोपी सुखदेव तिजोरे यास अटक करून पाथर्डी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ), (क), (ड) आणि (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. निरज राजगुरु आणि स्थानिक पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस हेडकॉन्स्टबल बाबासाहेब बडे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद यांचा सहभाग होता.या धाडीनंतर परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये या कारवाईची व्यापक चर्चा सुरू आहे. पाथर्डी पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे अवैध दारू व्यवसायांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट :
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलोभनासाठी होणाऱ्या अवैध व्यावसायिक हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले असून, पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिले आहेत.
