प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानकावर घडलेल्या सोन्या चोरीच्या घटनेचा उलगडा करत पोलिसांनी तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.

अल्पावधीतच चोरी गेलेले दागिने मुळ मालकाच्या ताब्यात परत देत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता व कर्तव्यदक्षतेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.फिर्यादी ज्योती राजकुमार ओस्तवाल (वय ५५, रा. पाथर्डी) या दि. ३० जुलै २०२५ रोजी दुपारी जुन्या बसस्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसत असताना त्यांच्या पर्समधील २०.५ ग्रॅम वजनाचे, बाजारभावानुसार सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. घटनेनंतर तत्काळ पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तपासाची सूत्रे हाती घेत पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पो.उ.नि. विलास जाधव तसेच पोलीस कर्मचारी अमोल आव्हाड, भगवान गरगडे, सचिन गणगे आणि महिला पोलीस मनिषा धाने या पथकाला आरोपींचा शोध घेऊन चोरी गेलेले सोने हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तातडीने तपास सुरू करत जुन्या बसस्थानक परिसरात शोधमोहीम राबवली.तपासादरम्यान दोन विधीसंघर्षित अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत या दोघांनी चोरीची कबुली देत चोरी केलेले दागिने सुरेश केशव साळवे (वय ३८) आणि अनिता सुरेश साळवे (वय ३२, रा. पाथर्डी) यांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. पोलिसांनी नमूद आरोपींना अटक करून त्यांच्या घरावर छापा टाकत पंचासमक्ष पंचनामा करून चोरी गेलेले सर्व दागिने हस्तगत केले.न्यायालयाच्या आदेशानुसार हे सोन्याचे दागिने आज फिर्यादी ज्योती ओस्तवाल यांना परत देण्यात आले.
या वेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सफौ. देविदास खैरे, पोना भगवान गरगडे, पोका सचिन गणगे आणि नितीन दराडे उपस्थित होते.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विलास पुजारी, पो.उ.नि. महादेव गुट्टे, पो.उ.नि. विलास जाधव, सफौ. देविदास खैरे, पोना भगवान गरगडे व पोका सचिन गणगे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या दक्ष तपासामुळे पाथर्डीतील जनतेत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
