प्रतिनिधी – सचिन दिनकर
अहिल्यानगर : मातंग समाजावर होत असलेला अन्याय, अपमान आणि अत्याचार याविरोधात आता मातंग समाज उभा ठाकला आहे.

समाजातील आत्मसन्मानाचा ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वावर होत असलेल्या वारांना उत्तर देण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर शहरात एक विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. लालटाकी येथील वीर लहुजी चौकात हा मोर्चा संपन्न होणार असून या मोर्चाद्वारे अन्यायाचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे.
समाजाचे नेते विजय (भाऊ) पठारे म्हणाले, “आज आपल्या मातंग समाजाच्या अनेक कुटुंबांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. खेडोपाडी अपमानास्पद वर्तन केले जात आहे. एवढंच नव्हे, तर आता आमच्या जातीवर उघडपणे शिवीगाळ केली जाते, टोमणे मारले जातात. आम्ही कोणाचं नाव घेत नाही, पण ज्यांनी आमच्या जातीचा अपमान केला — त्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. आमचा आवाज आता गप्प बसणार नाही.”या मोर्चाचा उद्देश सूड नव्हे, तर स्वाभिमान पुनर्स्थापित करणे आहे. “हा कोणाच्याही घरचा मोर्चा नाही; हा प्रत्येक मातंग बांधवाच्या आत्मसन्मानाचा, अस्तित्वाचा आणि न्यायाचा मोर्चा आहे,” असे विजय पठारे यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
ते पुढे म्हणाले, “ज्यांच्या मनात मातंग समाजाबद्दल प्रेम आहे, समाजाच्या वेदनेची तळमळ आहे. त्यांनी १० नोव्हेंबरला उपस्थित राहावे. आज फक्त मातंग समाजच नव्हे, तर इतर अनेक समाजघटकांवरही अन्याय होत आहेत. म्हणून, ज्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे, त्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे. हा संघर्ष समानतेसाठी आणि माणुसकीसाठी आहे.”
अहिल्यानगरचा हा मोर्चा समाजातील जागरूकतेचा आणि ऐक्याचा नवा संदेश देणारा ठरणार आहे. वीर लहुजी यांच्या स्मृतीस्थळी एकत्र येऊन अन्यायाला उत्तर देण्याची, स्वाभिमानाची ज्योत चेतवण्याची तयारी समाजाने केली आहे.
१० नोव्हेंबरचा दिवस आता मातंग समाजाच्या इतिहासात नव्या लढ्याची सुरुवात म्हणून कोरला जाईल.
