प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी: बुधवारी तालुक्यातील तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांमध्ये एकूण चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घाटशिरस येथील नवविवाहित जोडप्याने वडाच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली, पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात एका तरुणीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले, तसेच साकेगाव येथील एका युवकाने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे.बुधवारी दुपारी घाटशिरस येथे प्रियंका भाऊसाहेब माळी (वय 19) आणि तिचे पती भाऊसाहेब शिवराम माळी (वय 25) या दांपत्याने शिरापूर शिवारातील शेतातील वडाच्या झाडाला दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाडावरून दोघांचे मृतदेह खाली उतरवून पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. प्राथमिक चौकशीत घरगुती कारणांमुळे माळी दांपत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागातही आत्महत्येची आणखी एक घटना घडली. येथील संजना सुनील खुडे (वय 19) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजना हीदेखील पाथर्डी शहरातीलच रहिवासी असून तिने प्रेमविवाह केला होता. परंतु, विवाहानंतर तिचे पती सुनील राजू खुडे याच्यासोबत सतत वाद होत होते. तिला त्याच्याकडून नेहमी त्रास दिला जात असल्याचे समजते. त्यांच्या दांपत्याला दीड वर्षाचा लहान मुलगा आहे. दरम्यान, सुनील खुडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सुनील खुडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील इतर तिघांविरुद्ध संजना हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.तिसरी घटना साकेगाव येथील असून अंबादास पाराजी वाघ (वय 30) या युवकाने 31 ऑक्टोबर रोजी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला तातडीने अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी चार आत्महत्यांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
या सर्व घटनांची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक संदीप ढाकणे आणि जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा गुन्हा तपास, शवविच्छेदन आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम केले. पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर या सर्व घटनांशी संबंधित कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
बुधवारचा दिवस पाथर्डी तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी ठरला. एका दिवसात चार तरुणांचे अकाली झालेले मृत्यू पाहून संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त करण्यात येत आहे.
