प्रतिनिधी – सचिन दिनकर
भाविकांची ट्रॅव्हल्स अडवून लुट करणाऱ्या टोळीचा पाथर्डी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत पाच जणांना जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार, दोन मोटारसायकली आणि सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटकेतील आरोपींची नावे अशी आहेत – शुभम उर्फ मोन्या तर्क सावळा संजय भोसले (वय १९), मयुर संजय भोसले (वय २१), राहुल भगवान भोसले (वय २४, सर्व रा. कासारवाडी, पाथर्डी), नीलेश ईलिया बनकर (रा. करंजी, पाथर्डी) आणि किशोर रामदास वांद्रेकर (रा. मोहज खुर्द, पाथर्डी).
आरोपींकडून स्विफ्ट डिझायर (एमएच १२ जीएस ७३५९) व स्कॉर्पिओ (एमएच १६ डीएस १०७०) या दोन वाहनांसह गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासात ही दोन्ही वाहने लखन बाबासाहेब कासार (रा. कासारवाडी) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले असून, त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. मात्र तो सध्या पसार असून त्याच्या शोधासाठी तीन विशेष पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.मच्छिंद्रनाथ गडाचे दर्शन घेऊन शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स शुक्रवारी रात्री त्रिभुवनवाडी–खांडगाव परिसरात अडवून आरोपींनी पिस्तुलाच्या धाकावर रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. नाशिक येथील पवन सुखदेव खैरनार यांनी या घटनेची फिर्याद पाथर्डी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबमे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेसह समांतर तपास सुरू केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कर आरोपींना गजाआड केले.या कारवाईत पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक विलास जाधर, संदीप ढाकणे, निवृत्ती आगरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भौगे, मेघे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, वायासाहेब वडे, दादासाहेब बोरुडे, सुखदेव भोत्रे, भगवान गरगरे, आताफ शेख, नागेश वाघ, पोटभरे, इजाज सम्गद, महेश रर्यकर, अक्षय वडते, निलेश गुंड, भगवान टकले, अमोल पुगे, संजय जाधव, अशोक बुधवंत, अक्षय लबाडे, कानिफनाथ गोफणे, धनराज चाळक, महिला पोलिस अंजू सानप, उत्कृषा वडते आणि चालक रविंद्र चव्हाण या सर्वांच्या पोलिस पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावला.
अटकेतील आरोपींना न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. पाथर्डी पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
