उपसंपादक – सतीश मिरपगार
नेवासेफाटा । नेवासा-शेवगाव राज्य मार्गावरील नागापूर फाट्याजवळील वनीकरणाच्या वळणावर रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात वैभव मारुती दिघे (वय २२, रा. मुकिंदपूर, ता. नेवासा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव दिघे हा कुकाणा येथून आपल्या मोटारसायकलवरून मुकिंदपूरकडे जात असताना समोरून वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची धडक झाली. धडकेचा आवाज एवढा जोरदार होता की दोन्ही वाहने रस्त्यावर फेकली गेली. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मात्र, वैभव दिघे हा जागीच मृत पावला. तर मयूर भालेराव आणि शुभम भेंडेकर यापैकी एक जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.नागापूर शिवारातील हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, खड्डा चुकविताना एका दुचाकीचा तोल गेल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.या अपघातामुळे मुकिंदपूर आणि परिसरात शोककळा पसरली असून, तरुण वैभव दिघे यांच्या अकस्मात मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
