पाथर्डी शहर आज सकल बंजारा समाजाच्या संघर्षाने अक्षरशः दणाणून गेले. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी समाजाने काढलेल्या भव्य मोर्चाने शहरात घोषणांचा गजर घुमला.

महिला, पुरुष, युवक, वयोवृद्ध असे सर्वच घटक मोर्चात उतरले होते. “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, न्याय हवा – अन्याय नको” अशा जोरदार घोषणांनी वातावरण पेटून उठले.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाजातील हजारो बांधवांच्या उपस्थितीत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन देताना नेत्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “आमच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केले, तर राज्यभर तीव्र आंदोलन पेटवू.”

तांड्यांतील जिवंत वास्तव
निवेदनात बंजारा समाजाचे वेदनादायी वास्तव अधोरेखित करण्यात आले. “इतर राज्यांमध्ये आमच्या समाजाला संविधानिक सवलती मिळतात; परंतु महाराष्ट्रात आजही आम्ही पायाभूत सुविधांपासून वंचित आहोत. तांड्यांमध्ये लोकांना अंधार, पाण्याची टंचाई आणि स्थलांतराचा शाप भोगावा लागतो. अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे,” असा ठाम सूर निवेदनात उमटला.
नेत्यांचा लढाऊ सूर
आर. के. चव्हाण यांनी हैदराबाद गॅझेटमधील दाखल्यांचा उल्लेख करून “सरकारने अन्याय संपवून तातडीने निर्णय घ्यावा” अशी मागणी केली. तर नवनाथ चव्हाण, मोहन जाधव यांनी “हा लढा फक्त आरक्षणासाठी नाही, तर सन्मान आणि जगण्याच्या हक्कासाठी आहे. एकजूट ठेवली तर कोणीही आमचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही,” असा गर्जना केली.
मोर्चातील जनसागर
मोर्चात प्रभाकर पवार, विजय राठोड, किशोर राठोड, योगेश राठोड, संजय पवार, मोहन जाधव, प्रसाद राठोड यांसह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमुळे समाजाचा आत्मविश्वास उंचावला. सर्वदूर बंजारा बांधवांनी केलेल्या सहभागामुळे आंदोलनाला एक वेगळेच बळ मिळाले.
संघर्षाची नवी ठिणगी
मोर्चाचा शेवट निर्धाराने झाला. “हा लढा थांबणार नाही. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. न्याय मिळवण्यासाठी राज्यभर अस्मितेची ज्वाला पेटवू,” असा इशारा नेत्यांनी दिला.
