प्रतिनिधी – शकील शेख
“आम्ही विनंती नाही करत, हक्क मागतो आहोत !” या निर्धारपूर्ण घोषणांनी आज पैठण तहसील परिसर दणाणून गेला. राज्यातील परीट-धोबी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव तहसील कार्यालयात दाखल झाले.

आणि शासनाकडे निवेदन सादर करत आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली.
समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, परीट-धोबी समाज हा समाजाच्या स्वच्छतेचा, श्रमाचा आणि प्रामाणिकतेचा आधारस्तंभ आहे, तरी शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. “आमच्या सहनशीलतेची कसोटी पाहू नका. जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर १० नोव्हेंबरपासून नागपूर येथे राज्यव्यापी साखळी धरणे आंदोलन पेटेल,” असा इशारा या वेळी देण्यात आला.
या निवेदनात समाजाच्या सन्मान, आरक्षण आणि विकासाशी निगडित महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.
भाऊसाहेब बाबुराव घोंगडे, शिवाजीराव तरटे, आसाराम जाधव, संजय मोटे, राजेंद्र काशीद, तुकाराम तेलंगे, अरुण घोंगडे, राजेंद्र जाधव, रुपेश लोणे, सतीश आदमाने, किशोर आदमाने, रोहित चने, कार्तिक धोंगडे आणि दीपक जाधव आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या स्वाक्षऱ्यांद्वारे या लढ्याला बळ दिले.
पैठण तहसील कार्यालयासमोर झालेली समाजाची एकत्रित उपस्थिती ही एकजुटीचा प्रभावी संदेश ठरली. शासनाने न्याय द्यावा, अन्यथा राज्यभर परीट-धोबी समाजाचा आवाज आणखी तीव्र होईल, असा इशारा देत आजच्या आंदोलनाने नव्या चेतनेला सुरुवात केली आहे.
