शारदीय नवरात्र महोत्सव सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ पासून उत्साहात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलिस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचा निर्धार केला आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दर्शनव्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी देवस्थान परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान वाहनतळ, दर्शनमार्ग, अतिक्रमण निर्मूलन, गर्दी नियंत्रण यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी शेवगाव उपविभागीय अधिकारी श्री. गणेश उगले, पाथर्डी पोलिस निरीक्षक श्री. विलास पुजारी यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. देवस्थान प्रशासनाकडून भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या तुलनेत वाढीव बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती.
पोलिस अधीक्षक घार्गे यांनी या मागणीची दखल घेत राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलिस जवान तैनात करण्याचे आदेश दिले. तसेच गस्ती पथकांची संख्या वाढवण्याबरोबरच दर्शनमार्ग शिस्तबद्ध ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त करण्यात येणार आहे.

देवस्थानच्या वतीने विश्वस्त श्री. बाळासाहेब दहिफळे, श्री. शशिकांत दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरेश भणगे यांनी एसपी घार्गे यांचे स्वागत केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री. भिमराव खाडे, पोलिस व देवस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, दर्शनासाठी सुरळीत व्यवस्था राहावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने कसलीही त्रुटी राहू नये यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे.
👉 यामुळे यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव कडक बंदोबस्त, शिस्तबद्धता आणि सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडणार असून भाविकांना सुखकर दर्शनाचा लाभ होणार आहे.
