बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय ३५) यांनी मंगळवारी पहाटे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आश्चर्य म्हणजे ही घटना घडली ती एका नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर !

प्रेमातून मृत्यूकडे…
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी कला केंद्रात नर्तिका असलेल्या २१ वर्षीय पूजा गायकवाडची ओळख गोविंद बर्गे यांच्याशी झाली. ओळख हळूहळू प्रेमसंबंधात बदलली. पूजाच्या मोहात गोविंद इतके गुंतले की त्यांनी तिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने अशी महागडी भेटवस्तू दिली.
पूजा सोशल मीडियावर सक्रिय होती. ती नेहमी नाचाचे व्हिडिओ आणि रिल्स शेअर करायची. यामुळे तिची ओळख स्थानिक पातळीवर मोठी झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजाने गोविंदशी संवाद थांबवला होता. तिच्या या दुर्लक्षामुळे गोविंद नैराश्यात होते.
बंगला व जमीन मागितल्याचा आरोप
आरोप असा आहे की, पूजाने गोविंदकडे गेवराईतील त्यांचा बंगला स्वत:च्या नावावर करून देण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर तिच्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करून देण्याचा आग्रहही तिने धरला होता. या मागण्यांमुळे बर्गे कुटुंबीय संतापले होते.
मृत्यूच्या आदल्या रात्रीचा प्रसंग
सोमवारी रात्री गोविंद थेट पूजाच्या घरी गेले. मात्र, तेथील वातावरण अपेक्षेप्रमाणे न घडल्याने ते निराश झाले. काही तासांनीच त्यांनी पूजा गायकवाडच्या घरासमोर स्वत:च्या कारमध्ये बसून कानशिलात रिव्हॉल्व्हर लावून गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून परिसर हादरला आणि बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले.

गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून पोलीसांनी नर्तिका पूजा गायकवाडवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात प्रेमसंबंध, महागड्या भेटवस्तू, तसेच मालमत्तेसाठी केलेल्या मागण्यांमुळे गोविंद यांच्यावर मानसिक ताण वाढल्याचे समोर आले आहे.
👉 बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे समाजात खळबळ उडाली असून, प्रेमसंबंध, पैसा आणि हव्यास यामुळे एका प्रतिष्ठित व्यक्तीचे आयुष्य अकाली संपल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.
