पाथर्डी आगाराला मिळणार १० नवीन एसटी बस; प्रवाशांना दिलासा, आमदार गर्जे यांच्या पाठपुराव्याला यश
पाथर्डी : तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे एसटी सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला होता.

प्रतिनिधी सचिन दिनकर
या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव गर्जे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाथर्डी आगारासाठी नव्या बस गाड्यांची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून पाथर्डी आगाराला १० नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाला दिले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रवासी संघटनांनी याचे स्वागत केले आहे.सध्या उन्हाळी सुट्ट्या, धार्मिक पर्यटन, धोंड्याचा महिना आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. विशेषतः नगर–पाथर्डी–नगर या मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असून, उपलब्ध बस गाड्या अपुऱ्या पडत असल्याने अनेक वेळा फेऱ्यांचे नियोजन विस्कळीत होत होते. यामुळे प्रवाशांचा संताप वाढत होता तसेच आगाराच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता.पाथर्डी आगाराचे प्रमुख अमित बनसोडे यांनी प्रवासी संघटनांच्या शिफारशीवरून आमदार गर्जे यांच्याकडे वाढीव बस गाड्यांची मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानंतर आमदारांनी तातडीने याबाबत हालचाली करत परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि अखेर १० नवीन गाड्यांना मंजुरी मिळवली.जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक प्रवासी संख्या पाथर्डी तालुक्यात असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पाथर्डी मार्ग ओळखला जातो. बीडहून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवगण राजुरी, शिरूर, चिंचपूर मार्गे जाणारा रस्ता कमी अंतराचा असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच कारणामुळे जामखेड मार्गे जाणारी काही खाजगी वाहतूकही आता पाथर्डी मार्गे वळली आहे.पंढरपूर, सोलापूर, संभाजीनगर, वैजापूर, अक्कलकोट, शेगाव, नांदेड तसेच तिसगाव मार्गे नाशिक या मार्गांवर नव्या फेऱ्या सुरू करण्यासाठी बस गाड्यांची आवश्यकता भासत होती. यापूर्वीही आमदार गर्जे यांनी तत्कालीन परिवहन मंत्री सुभाष ठाकरे यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून कोल्हापूर मार्गासाठी बस सेवा सुरू करण्यास परवानगी मिळवली होती. ही गाडी आजही उत्पन्न देणारी ठरत आहे.दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासह कार्यकारी संचालकांना तातडीने गाड्या उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतचे पत्र प्राप्त होताच पाथर्डी आगारातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मागील वर्षी आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून पाथर्डी आगाराला १० नवीन गाड्या मिळाल्या होत्या. मात्र जुन्या गाड्यांपैकी सात गाड्या भंगारात गेल्याने पुन्हा गाड्यांची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे नव्या गाड्यांची मागणी अधिक तीव्र झाली होती.यावेळी आमदार गर्जे यांनी परिवहन मंत्र्यांकडे पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधी देण्याची मागणीही केली आहे. अद्ययावत बस स्थानकासह व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला असून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सध्या अहिल्यानगरहून पाथर्डीकडे सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत बस सेवा अपुरी पडत असल्याने प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनाने विशेष नियोजन करून या वेळेत बस फेऱ्या वाढवाव्यात, तसेच पुणे–पाथर्डी–पुणे मार्गावर उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.नव्या १० बस गाड्यांच्या मंजुरीमुळे पाथर्डी आगाराच्या सेवेला नवे बळ मिळणार असून प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
