प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी शहरात सुरू असलेल्या जलयोजनेच्या कामाने अंतिम टप्पा गाठला असला, तरी नागरिकांच्या सुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

रामगिरबाबा टेकडी ते नॅशनल हायवे ६१ लगत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, अचानक बदललेल्या या रस्त्याविषयी कोणतीही पूर्वसूचना किंवा सुरक्षा फलक नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
दररोजच्या सवयीप्रमाणे ये-जा करणारे वाहनचालक या मार्गावर येत असताना, खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे गाड्या घसरून अपघात होत आहेत. आजही अशाच प्रकारे काही वाहनचालक जखमी झाल्याची घटना घडली.
विशेष म्हणजे, या ठिकाणी तिन्ही बाजूंनी सुरक्षा फलक लावणे आवश्यक असताना एकही इशारा फलक लावलेला नाही.

सदर बाब ठेकेदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काम सुरू ठेवताना किमान सुरक्षा उपाययोजना करणे ही जबाबदारी असताना, या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने याकडे लक्ष देत आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
