February 21, 2026

पाथर्डी — शहरात प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कायद्याविषयी आदर अधोरेखित करणारी एक प्रेरणादायी घटना घडली आहे.

येळे येथील रहिवासी ६७ वर्षीय श्रीमती सुलोचना भास्कर बडे या ५ डिसेंबर रोजी दुपारी खरेदीसाठी पाथर्डीत आल्या होत्या. खरेदी उरकून बसस्थानक परिसरातील दुकानदार बळीराम माधव घुमरे यांच्या दुकानावर त्यांनी चहा घेतला. घाईत असताना त्यांचे पाकीट दुकानदाराच्या दुकानातच राहिले आणि त्या आपल्या गावाकडे रवाना झाल्या. थोड्या वेळानंतर दुकानाच्या परिसरात पडलेले पाकीट बळीराम माधव घुमरे यांच्या निदर्शनास आले. कोणताही गैरफायदा न घेता त्यांनी तात्काळ हे पाकीट पाथर्डी पोलीस ठाण्यात जमा करून आपली सामाजिक जाणीव दाखवून दिली. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी संबंधित महिलेचा संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले.

आवश्यक चौकशी व खातरजमा केल्यानंतर सदर पाकीट संपूर्ण रक्कम व कागदपत्रांसह त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या पाकिटात रोख रक्कम ५,७१० रुपये, आधार कार्ड, ओळखपत्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित स्थितीत आढळून आली. या प्रामाणिक कृत्याबद्दल पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या हस्ते श्री बळीराम माधव घुमरे यांचा पोलीस ठाण्याच्या वतीने शाल व साहित्य देऊन औपचारिक सन्मान करण्यात आला. हरवलेले पाकीट पूर्णपणे सुरक्षित परत मिळाल्याने श्रीमती सुलोचना भास्कर बडे यांनी समाधान व्यक्त करत पाथर्डी पोलीस प्रशासन व श्री बळीराम माधव घुमरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा घटनांमुळे समाजात प्रामाणिकपणा आणि विश्वास अधिक दृढ होतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले असून, पाथर्डी पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणतीही हरवलेली वस्तू सापडल्यास ती त्वरित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!