February 21, 2026

घोडेगाव | गावातील व्यापारी वर्ग पुन्हा एकदा चोरट्यांच्या धुमाकुळाने हादरला आहे. स्थानिक कापड व्यापाऱ्याच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी उशिरा रात्री घडली.

या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव येथील प्रसिद्ध कापड व्यावसायिक सचिन मदनलाल देसरडा यांच्या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर चोरट्यांनी प्रवेश केला. अत्यंत कौशल्याने त्यांनी भिंतीवरील खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश मिळवला. त्यानंतर दुकानातील रोकड ठेवलेल्या कपाटातील सुमारे २ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. चोरीनंतर चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे न ठेवता घटनास्थळावरून फरारी घेतली.ही घटना रविवारी सकाळी उघडकीस येताच व्यापारी वर्गात खळबळ उडाली. नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली. घटनेची माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून सविस्तर पाहणी केली असून, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावरून प्रवेश केल्यामुळे ही चोरी अत्यंत नियोजनबद्धपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.घोडेगावात गेल्या काही दिवसांपासून लहान-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढविण्याची मागणी केली असून, या प्रकरणातील चोरट्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!