प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, यासाठी संगमनेर महाविद्यालयाने एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. धर्म, संस्कृती आणि करुणा यांच्या संगमातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाने समाजसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

संगमनेर येथील उद्योजक मालपाणी कुटुंबाच्या संस्काराच्या मुशीत घडलेले प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाखाली “पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिवाळी भेट” देण्याचा निर्णय घेतला. या कार्यात महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग राहिला. एन.एस.एस. विभागाच्या विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून तब्बल दोन लाख रुपयांची निधी उभारणी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये अत्यंत भावनिक वातावरणात हा साहित्य वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या किटमध्ये आवश्यक व आकर्षक अशा वस्तूंचा समावेश होता. मुलांसाठी पॅन्ट-शर्ट,मुलींसाठी पंजाबी ड्रेस, त्यासोबत शिलाईसाठी रोख रक्कम,स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, रायटिंग पॅड, मिठाई बॉक्स, पणत्या, रंगीत रांगोळ्या, आकाश कंदील, वॉटर बॅग आणि बिस्किट पुडे अशा विविध वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. धर्म आणि संस्कृतीचा सन्मान राखत आकाश कंदील, रांगोळ्या आणि पणत्या यांचा समावेश करण्यात आला ही बाब विशेष ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड,विद्यार्थी कल्याण मंडळाचे जिल्हा समन्वयक प्रताप फलफले, डॉ. रवींद्र गायकवाड, योगेश कटके,बाळासाहेब गाडेकर,प्राचार्य डॉ. बबन चौरे, डॉ.विजय देशमुख,डॉ. अशोक कानडे,भगवान सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात तालुक्यातील ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबांनाही प्रतीकात्मक स्वरूपात किटचे वाटप करण्यात आले. आपल्या मनोगतात डॉ. जी. पी. ढाकणे म्हणाले,संगमनेर महाविद्यालयाची सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक जबाबदारीची भावना जिल्ह्यात आदर्शवत आहे. दिवाळीचा खरा अर्थ समजून घेत पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणारा हा उपक्रम लाखमोलाचा आहे. संजय मालपाणी यांच्या वैचारिक मार्गदर्शनाखाली महाविद्यालय खऱ्या अर्थाने गरजूंच्या मदतीला धावून आले आहे. इतरांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद बघण्यात जी धन्यता आहे, तीच खरी जीवनाची पूर्तता आहे. ते पुढे म्हणाले की, अशा कृतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिकता आणि संस्कारांचे बीज रोवले जाते. “महाविद्यालय म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तर संस्कार व संस्कृतीचे विद्यालय आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बबन चौरे,सूत्रसंचालन डॉ. वैशाली आहेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरुण राख यांनी मानले. संगमनेर महाविद्यालयाच्या या उपक्रमाने केवळ दिवाळीच नव्हे, तर पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा आणि आत्मविश्वासाचा नवा दिवा प्रज्वलित केला आहे. धर्म, संस्कृती आणि मानवतेचा संगम असलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
