February 19, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

मुंगूसवाडे येथे उचल फाउंडेशन तर्फे ऊसतोडणी कामगार महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले.

गेली सात वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ऊसतोडणी करणाऱ्या महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे.या वेळी प्रथमच हे शिबिर ऊसतोडणीपूर्वी घेण्यात आले असून, ऊस तोडून आल्यानंतरही असेच शिबिर होणार आहे. त्यामुळे महिलांच्या शारीरिक क्षमतेवर ऊसतोडणीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून महाराष्ट्रात पहिल्यांदाच अहवाल तयार करण्यात येणार आहे.या शिबिरात शंभराहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. स्नेहालय संस्थेच्या फिरत्या दवाखान्यामुळे तपासणी अधिक सोपी झाली. तपासणीत महिलांमध्ये कमी एच.बी., पाठदुखी, कंबरदुखी, गंभीर थकवा, कुपोषण यासारख्या समस्या प्रकर्षाने दिसून आल्या. काही गरोदर महिला ऊसतोडणी करत असल्याचेही निदर्शनास आले.महिलांनी संवादादरम्यान आपल्या अडचणी मांडल्या. काही जणींनी मुलांना सोबत नेण्याचे सांगितल्याने त्यांच्या शिक्षणावर संकट येणार असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण भागातील शैक्षणिक वास्तव, लवकर लग्नामुळे वाढते कुपोषण, पुरुषांमधील दारू व मावाच्या व्यसनामुळे महिलांवर पडणारा ताण या समस्याही समोर आल्या.

या उपक्रमात डॉ. मनीषा लड्डा व डॉ. साक्षी नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले तर पुरुष ऊसतोड कामगारांचीही तपासणी करण्यात आली. उचल फाउंडेशनच्या सुजाता खेडकर, गणेश केदार, मोतीलाल बंसवाल, प्रमोद दळवी, सविता खेडकर, भाग्यश्री खेडकर तसेच स्व. गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी योगदान दिले.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!