February 21, 2026

पाथर्डी_नाटक ही फक्त रंगभूमीवरील कला नसून संगीत, नृत्य, गायन आणि अभिनय या सर्व कलांचा समन्वय असलेली जिवंत परंपरा आहे.

परंतु आधुनिक युगात सोशल मीडियामुळे या कलेला मिळणारे स्थान कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाट्यस्पर्धा आणि एकांकिका महोत्सव नियमितपणे आयोजित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय एकांकिका महोत्सव ‘जल्लोष २०२५’ चे उद्घाटन अभय आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन चौरे होते.

व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, मुख्याध्यापक शरद मेढे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभय आव्हाड यांनी भारतीय नाट्यशास्त्राचा गौरव करत सांगितले की नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम राहिले आहे. सोशल मीडिया व ओटीटीच्या युगात ही कला लोप पावत असल्याने महाविद्यालय स्तरावर या कलेला नवी ऊर्जा मिळावी यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. ही संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महोत्सवात विविध महाविद्यालयांनी ‘आम्ही यशवंत ऋणी बाबुजींचे’, ‘तिचा आक्रोश’, ‘चवदार तळे’, ‘शिक्षण हा आमचा अधिकार’, ‘मंचलाईट’ आणि ‘साक्षरतेचे दीप – स्री शिक्षण’ या एकांकिका सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

‘आम्ही यशवंत ऋणी बाबुजींचे’ या नाटकाला प्रथम, ‘मंचलाईट’ला द्वितीय आणि ‘साक्षरतेचे दीप – स्री शिक्षण’ला तृतीय क्रमांकाचा मान मिळाला. ‘चवदार तळे’ या नाटकाला उत्कृष्ठ सांघिक अभिनय पुरस्कार मिळाला तर ‘शाहीर’ या भूमिकेसाठी वरून सानप या विद्यार्थ्याचा उत्कृष्ठ अभिनयसाठी गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून राम कोरडे आणि योगेश रोकडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात नाट्यदिंडी आणि नटराज पूजनाने झाली. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि नाट्यरसिकांनी सर्व नाटकांना भरभरून दाद दिली. डॉ. अशोक डोळस यांनी प्रास्ताविक केले, डॉ. वैशाली आहेर यांनी सुत्रसंचालन तर डॉ. भगवान सांगळे यांनी आभार मानले. हा सांस्कृतिक सोहळा विद्यार्थ्यांमध्ये कला, सृजनशीलता आणि आत्मविश्वास यांचा नवोन्मेष निर्माण करणारा ठरला.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!