शेवगाव तालुक्यातील क-हे टाकळी येथील दलित वस्ती अंधारात बुडाली असून महिलांपासून मुलांपर्यंत सर्वच नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी_संदिप नांद्रे
वस्तीमध्ये उभारलेले वीजखांब असूनही त्यावर बल्ब नाहीत, त्यामुळे संध्याकाळ होताच संपूर्ण परिसर काळोखाने झाकला जातो.
रात्री महिलांना आणि मुलांना घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या पाण्याच्या वाल्व्ह चेंबरच्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती कायम आहे. त्यात भर म्हणजे वस्तीतील सार्वजनिक शौचालय बंद असून, अंधारामुळे महिलांना व मुलींना असुविधांचा सामना करावा लागत आहे. शौचालयाजवळ सुरू असलेले अवैध दारूधंदे महिलांच्या सुरक्षेला अधिकच धक्का पोहोचवत आहेत.

ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांचा इशारा स्पष्ट आहे.
“वीजखांबांवर बल्ब बसवा, उघडे खड्डे बुजवा, शौचालय सुरू करा आणि अवैध दारूधंद्यावर कठोर कारवाई करा; अन्यथा आंदोलन अटळ आहे.”

ग्रामस्थांचा संताप वाढत असून प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येथील महिलांची सुरक्षा आणि नागरिकांचे आरोग्य यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा प्रश्न केवळ सुविधा नसण्याचा नाही, तर मानवी हक्क आणि सुरक्षेचा आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
