मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक शुक्रवारी आझाद मैदानावर धडकणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून आझाद मैदान परिसरात दिड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा देखील शुक्रवारी मुंबईत येणार असल्याने मुंबई पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे.मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी रात्री मराठा मुंबईत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतून गुरूवारी रात्री अटल सेतूवर हा जत्था दाखल होईल तेथून मुक्तमार्गाने (फ्री वे) आझाद मैदानात रवाना होणार आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असे हे आंदोलन होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कंबर कसली आहे.पोलिसांचा प्रचंड बंदोबस्तगणेशोत्सवकाळात मुंबई पोलिसांनी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात येणार असल्याने तेथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आंदोलन स्थळ आझाद मैदान येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात २ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ६ पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, २०० सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि १३०० पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलन एकत्र येणार असल्याने कुठलेही गालबोट लागू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.पोलिसांची सत्वपरिक्षाशुक्रवारचा दिवस पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. गणेशोत्सवातच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारीच मुंबईतील गणेशोत्सव दर्शनासाठी येणार आहेत.शहा हे मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळ आणि मुंबईतील भाजप नेत्याच्या घरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. शहा यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिसांची सत्वपरिक्षा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनापूर्वी लालबाग राजाच्या दर्शनाला जाणार आहे.
