उपसंपादक सतिश मिरपगार
पाथर्डी : 5 फेब्रुवारी 2026 :रोहतक (हरियाणा) येथे पार पडलेल्या स्पेशल ऑलिम्पिक भारत या दिव्यांगांच्या राष्ट्रीय पातळीवरील विशेष ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पाथर्डी तालुक्यातील मोहरी रोड येथील मतिमंद मुलांचे बालगृह (जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत) येथील बौद्धिक अक्षम प्रवेशित विद्यार्थी चि. जयसिंग यादव याने घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.

जयसिंग यादव याने
👉 800 मीटर धावणे (रिले) स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक
👉 तसेच 400 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले आहे.
एकाच स्पर्धेत 1 गोल्ड व 1 सिल्वर मेडल मिळवून जयसिंगने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे दर्शन घडविले आहे. ग्रामीण भागातील बालगृहातील विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून अनेक दिव्यांग मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.या यशामागे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.कार्यालय प्रमुख देविदास कोकाटे,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अभिजीत दिवटे,डॉ. अनाप सर, तसेच संदिप रहाणे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून जयसिंगला प्रोत्साहन दिले.स्पर्धेच्या तयारीसाठी बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे,क्रीडा प्रशिक्षक दत्तात्रय कोलते,शिक्षक नितेश ओझरकरतसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन सराव करून घेतला.
जयसिंगच्या या यशामुळे पाथर्डी तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशासन, शिक्षकवृंद व नागरिकांनी जयसिंगच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
