उपसंपादक सतीश मिरपगार
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर व दोन ट्रॉली मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली.

कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे हे ट्रॅक्टर तिसगाव येथील पुलाच्या पुढील वळणावर टर्न न बसल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.तिसगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. कधी ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना, तर कधी दुचाकींच्या धडकांमुळे नागरिक जखमी होत आहेत. विशेष म्हणजे हा मार्ग ऊस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात असल्याने रात्री-अपरात्रीही अवजड वाहनांची वर्दळ असते. पुलानंतरचा वळणाचा भाग अरुंद व धोकादायक असल्याने येथे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.

दरम्यान, तिसगाव येथे आठवडे बाजार भरत असल्याने याच राष्ट्रीय महामार्गावर व्यापारी थेट रस्त्याच्या कडेला बसतात. त्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालक, पादचारी आणि व्यापारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गर्दी, अवजड वाहनांची ये-जा आणि रस्त्यावर अडथळे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतीकडून अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. अपघात झाल्यानंतर केवळ पाहण्याची भूमिका घेतली जाते, मात्र अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. परिणामी व्यापारी व नागरिकांना दर आठवड्याला आपला जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागत आहे.लवकरात लवकर आठवडे बाजार महामार्गावरून हलवून मोकळ्या व सुरक्षित जागेत भरवावा, तसेच धोकादायक वळणावर वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर आणि पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थ व व्यापारी मिळून लवकरच रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
