प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी : मुळा धरणातील गाळ काढून अधिक पाणी निर्माण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, या प्रकल्पामुळे दोन ते अडीच टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी वांबोरी चारी टप्पा-१ च्या कामाचे भूमिपूजन केले. सुमारे १४.६० कोटी रूपये निधी उपलब्ध करून या कामाला सुरुवात करण्यात येईल.
या प्रसंगी आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, अक्षय कर्डीले, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सरकारच्या प्रयत्नांतून चारीचं काम गतिमान झालं आहे. राज्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या धोरणाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.मुळा धरणाच्या ५२ कि.मी. लांबीच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून, त्या कामालाही प्रारंभ झाला आहे. तसेच वांबोरी चारीच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी घाटशिरस येथे बुस्टर पंप बसविण्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पाण्याच्या वीज खर्चाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी १५० मेगावॅट क्षमतेचा फ्लोटींग सोलार प्रकल्प उभारण्याचा विचार विभागाच्या स्तरावर सुरू आहे.
आ. मोनिका राजळे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे वेगाने आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, स्व. कर्डीले यांच्या समन्वयातून ३९ गावांत ठोस विकासकामे झाली आहेत आणि भविष्यातही हा समन्वय कायम राहील.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी वांबोरी चारीच्या कामासाठी घेतलेल्या पाठपुराव्याची आठवण करून दिली. लोकाभिमुख प्रकल्पांचे श्रेय स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळावे, असे त्यांनी सांगितले. उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अक्षय कर्डीले यांनी जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विखे, राजळे, जगताप परिवाराच्या मार्गदर्शनाखाली परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
