February 18, 2026

पाथर्डी तालुक्यातील वृद्धानदी किनाऱ्यावरील जवखेडे खालसा, जवखेडे दुमाला, कासारवाडी, कामत शिंगवे, कोपरे आणि श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या गावांमध्ये बिबट्यांचा संचार दिवसेंदिवस वाढत असून, नागरिक भयभीत झाले आहेत.

तिन्ही बिबटे त्यातील एक मादीसह सतत मानवी वस्तीत मुक्तपणे वावरत असल्याने गावकऱ्यांना रात्र नकोशी झाली आहे.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी सुमारे आठच्या सुमारास वैभव आंधळे यांना डागातील देवी मंदिराजवळ बिबट्या स्पष्ट दिसला. त्या वेळी कांदा मालवाहतुकीच्या वाहनाच्या प्रकाशात तो क्षण काही गावकऱ्यांनी मोबाईलमध्ये टिपला. बिबट्याचे ते चित्रीकरण आता परिसरात व्हायरल झाले असून, नागरिकांच्या भीतीत भर पडली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत सचिन शिवाजी नेहुल, गुलाब रमजू शेख, बलभीम आश्रू नेहुल यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्या ठार केल्या आहेत. तर दोरकाबाई जगन्नाथ आंधळे आणि धर्मनाथ लक्ष्मण वाघ यांच्या शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याशिवाय, हनुमान टाकळी येथील देवराव मारुती बर्डे यांच्या दोन शेळ्या आणि दोन बोकड, तसेच मच्छिंद्र बावणे, लहानु बावणे, बाप्पू भगत यांच्या प्रत्येकी एक शेळी बिबट्याने फस्त केल्याचे समोर आले आहे.

स्थानिक नागरिक सांगतात की, म्हसोबा लवण परिसरात सूर्यास्तानंतर बिबट्याचे दर्शन रोजचे झाले आहे, अशी माहिती यमाजी भिसे यांनी दिली. या परिसरातील गुराखी आणि शेतकरी संध्याकाळनंतर शेतात जाणे टाळत आहेत.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!