February 19, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी गा वात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या वृद्ध महिलेच्या खुनाच्या घटनेचा थरारक उलगडा अखेर पाथर्डी पोलिसांनी केला आहे.

लोभ आणि पैशाच्या हव्यासापोटी नात्याचं पावित्र्य चिरडणाऱ्या नातवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली आहे.

सदर घटना 6 मे 2025 रोजी रात्री ते 8 मे च्या सकाळपर्यंत घडली होती. मिरी येथील किसनबाई छगन मँदड (वय 75) या महिलेला अज्ञात व्यक्तीने निर्दयीपणे मारहाण करून ठार केले होते. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत घरातच जाळून टाकण्यात आले होते. या प्रकरणी मृत महिलेची मुलगी छाया हरीश्‍चंद्र खोसे (रा. निंबेनांदूर) हिने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 514/2025 नोंदवण्यात आला होता.तपासादरम्यान पोलिसांनी विविध कोनातून चौकशी करत तांत्रिक पुरावे गोळा केले. अखेर पोलिसांना धक्कादायक सत्य हाती लागले खून करणारा दुसरा कोणी नसून मृत महिलेचाच नातू सचिन सुरेश मँदड (वय 30, रा. माळवाडी, वडगाव गुप्ता) हाच आहे.तपासात उघड झाले की, किसनबाईंनी त्यांच्या नावावर असलेली दोन गुंठे जागा 12 लाख रुपयांना विकली होती. त्या पैशांपैकी 10 लाख रुपये दोन्ही नातवांनी सचिन आणि चैतन्य वाटून घेतले, तर उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेत फिक्स डिपॉझिट स्वरूपात ठेवले होते. त्या फिक्स डिपॉझिटमध्ये वारस म्हणून चैतन्यचे नाव असल्याने सचिनच्या मनात आजीबद्दल राग आणि मत्सर निर्माण झाला. या वैमनस्यातूनच त्याने आजीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आधीपासूनच घरगुती वाद सुरू होते. संक्रांतीच्या काळातही सचिनने आजीला मारहाण केली होती. त्या वेळी ती गंभीर जखमी झाल्यावर उपचारासाठी नेण्याऐवजी सचिनने तिला एकटीला घरी सोडले होते. अखेर 6 मे रोजी त्याने आजीचा निर्दयीपणे खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेताला आग लावल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.आरोपी सचिन सुरेश मँदड याला 8 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तपास पथकात स.फौ. नितीन दराडे, पो.हे.कॉ. बाबासाहेब बडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर इलग आणि पो.कॉ. इजाज सय्यद यांचा समावेश आहे. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!