February 21, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

पाथर्डी — मोहटा देवी यात्रेच्या सांगतेला झालेल्या कुस्ती हगाम्याने रसीकांचे डोळ्यांचे पारणे फेडले.

मोहटा देवी गडाच्या पायथ्याशी उभारलेल्या आखाड्यावर दुपारी अडीच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या कुस्त्यांचा खऱ्या अर्थाने थरार अनुभवायला मिळाला. डफ वादकांच्या तालावर घुमणारे घोष, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, विजयी मल्लांचा जल्लोष आणि प्रत्येक डाव-प्रत्यडावातील ताणतणाव यामुळे वातावरण अगदी दणाणून गेले. या पारंपरिक कुस्ती हगाम्यात सोलापूर, पुणे, राहुरी, आष्टी, संभाजीनगर, बीड यांसारख्या विविध जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला. महिलांनीही अखाड्यात उतरून आपल्या दमदार झुंजींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या हगाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही कुस्ती बोली न लावता खेळवली जाते. देवस्थान समिती व पंच मंडळाकडून मिळणारे बक्षीस मल्ल भक्तिभावाने स्वीकारतात, आणि ती बिदागी देवघरात अर्पण केली जाते — हीच या परंपरेची खरी ओळख. एकापाठोपाठ एक चितपट कुस्त्यांनी वातावरणात ऊर्जेचा लहरता उत्साह भरला. दोनच कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या, तर उर्वरित सर्व कुस्त्या थरारक चितपट झाल्या. शेवटची मानाची कुस्ती बीड विरुद्ध अहमदनगर दरम्यान रंगली.

राहुरी (अहमदनगर) येथील अनिल ब्राह्मणे आणि मानूर (बीड) येथील सचिन शिर्के यांच्यातील झुंज उत्कंठावर्धक ठरली. अखेर ग्रामस्थ व पंच समितीच्या निर्णयानुसार ही मानाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. नवस बोललेल्या अनेक भक्तांनी आपल्या कुस्त्यांच्या बिदागी देवळात अर्पण करून नवस पूर्ण केला. देवस्थान समितीचे विश्वस्त, ग्रामस्थातील पंच, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आणि लेखनिक संदीप घुले यांच्या हस्ते सर्व विजयी मल्लांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. या कुस्ती हगाम्याने यात्रेला भावनिक व पारंपरिक स्पर्श देत सांगता केली. सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी किर्तनाच्या आयोजनाने शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!