राज्य सरकारने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेला जी.आर हा ओबीसी समाजाच्या अस्तित्वावर गदा आणणारा असल्याचा आरोप करत पैठण तहसील कार्यालयावर आज ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला.

तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत हा मोर्चा उभारला. मोर्चाला ओबीसी नेते बळीराम तात्या खटके, बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब देखणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर प्रकाश दिलवाले यांच्या नेतृत्वाखाली हा लढा एकजुटीने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
मोर्चाच्या सुरुवातीला विविध संघटनांचे कार्यकर्ते, समाजाचे नेते आणि युवक मोठ्या उत्साहाने एकत्र जमले. “ओबीसी हक्क वाचवा”, “मराठा आरक्षणाचा जी.आर रद्द करा”, “आमच्या आरक्षणात घुसखोरी मान्य नाही”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसील कार्यालयासमोर नागरिकांनी प्रचंड गर्दी करत प्रशासनाला आपली ताकद दाखवून दिली.
ओबीसी नेते बळीराम तात्या खटके यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनिक आणि धारदार भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट सांगितले – “ओबीसी समाजाचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, पण आमच्या आरक्षणात घुसखोरी करून आमच्या समाजावर अन्याय करू नये. सरकार सांगते की ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नाही’, मग तो धक्का कसा नाही हे आम्हाला समजावून सांगावे. काही जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी आमच्या समाजाची राजकीय कारकीर्द संपते. ग्रामपंचायतसारख्या स्थानिक निवडणुकीत उभे राहणेही शक्य होत नाही. आमच्या समाजाच्या अस्तित्वावर गदा आली तर आम्ही गप्प बसणार नाही. जर सरकारने हा जी.आर रद्द केला नाही, तर आम्ही थेट मुंबई गाठून रास्ता रोको करणार आणि न्याय मिळवून घेणार!”
त्यांनी पुढे ज्या आमदारांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिले त्यांच्यावर टीका करत म्हटले – “ओबीसी समाजाच्या मतदानाला किंमत नाही. जे आमदार आमच्या मतांवर निवडून आले, त्यांनी आमच्या हक्कांचा विचार न करता मराठा आरक्षणास समर्थन दिले. याचा हिशोब आम्ही भविष्यात नक्कीच करून दाखवू. आमच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.”
बाबासाहेब बटुळे आणि बाळासाहेब देखणे यांनीही उपस्थित समाजाला मार्गदर्शन करत स्पष्ट सांगितले. “वेळ पडली तर आम्ही मुंबईला जाऊन संघर्ष करणार आहोत. ओबीसी समाज आता जागृत झाला आहे. अन्याय सहन करणार नाही. आमच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत.”
या मोर्चाला तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवत सहकार्य केले. मोर्चाच्या शेवटी प्रकाश दिलवाले यांनी समाजाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “एकजूट आणि संघटनाशक्तीच्या बळावरच आपला हक्क मिळवता येतो. ओबीसी समाज आता निर्धाराने पुढे चालला आहे.”
मोर्चात महिलांसह युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. अनेकांनी हातात फलक घेऊन प्रशासनाला आणि सरकारला इशारा दिला की, ओबीसी समाज आपले हक्क गमावणार नाही. परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु मोर्चा शांततेत पार पडला.
आजच्या या मोर्चाने ओबीसी समाजाचा संताप, असंतोष आणि न्यायासाठी झगडण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे. सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा जी.आर रद्द करावा, अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होईल, असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे. पुढील काळात ओबीसी हक्कासाठी सुरू होणाऱ्या लढ्याला कोणती दिशा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
