February 19, 2026

अहिल्यानगर_पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला व जुन्नरच्या सीमेलगत असलेला भाग बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे धोकादायक झोन म्हणून ओळखला जातो. आळकुटी, शिरापूर, म्हस्केवाडी, कळस, गारखिंडी, लोणी मावळा व दरोडी परिसरात बिबट्यांचा सुळसुळाट असून ग्रामस्थ कायम भीतीच्या छायेत जगत आहेत.

│प्रशांत बाफना, जिल्हा प्रतिनिधी│

याच पार्श्वभूमीवर २ सप्टेंबर रोजी कळस येथील रानमळा रस्त्याजवळील ऊसाच्या शेतात घडलेली घटना सर्वांना हादरवून गेली. गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) या निष्पाप तरुणाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही केवळ अपघातजन्य घटना नसून वनविभागाच्या हलगर्जीपणाचे थेट दुष्परिणाम असल्याचा ठाम आरोप ग्रामस्थ करत आहेत.

या घटनेच्या केवळ आठ दिवस आधीच ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी बिबट्यांचा वावर वाढल्याचे निदर्शनास आणून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पण वनअधिकाऱ्यांनी ही बाब उडवाउडवीने घेतली. ग्रामस्थांच्या repeated मागण्यांकडे दुर्लक्ष करून दाखवलेल्या बेफिकीरीमुळेच आज हा बळी गेला, अशी ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया आहे.

कळस परिसरात बिबट्यांचे दर्शन व जनावरांवरील हल्ले ही रोजचीच बाब झाली आहे. पण पिंजरे, गस्त किंवा जनजागृती मोहिमांचा ठोस अभाव जाणवतो. “आमच्या जीवाची किंमतच नाही का वनविभागासाठी?” असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

वनविभागाकडून पकडलेले बिबटे अणे घाट किंवा माळशेज घाटात सोडले जातात. मात्र हेच बिबटे परत पठार भागाकडे वळत असल्याने नागरिकांचा धोका आणखीन वाढतो. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज गणेश गाडगेचा बळी गेला, उद्या कोण? असा प्रश्न आता सर्वांना अस्वस्थ करत आहे. ग्रामस्थांचे म्हणणे स्पष्ट आहे –
👉 तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेची हमी द्यावी.
👉 अन्यथा पुढील दुर्घटनांना जबाबदार ठरण्याची वेळ थेट वनविभागावर येईल.

ग्रामस्थांच्या संयमाचा अंत जवळ आला आहे. योग्य ती पावले न उचलल्यास संतप्त जनतेचा उद्रेक व आंदोलन अटळ ठरेल, हे निश्चित!

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!