उपसंपादक सतिश मिरपगार
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे भरवस्तीतून दुचाकी चोरीची धक्कादायक घटना घडली असून, सुजुकी एक्सेस कंपनीची स्कुटी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.तिसगाव येथील रहिवासी साहील करमहशेन खान (व्यवसाय – पानशॉपी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, ते पत्नी मिनाज, मुलगा आहिल व मुलगी रिजा यांच्यासह संयुक्त कुटुंबात राहतात व पानशॉपी व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता साहील खान यांनी आपली सुजुकी एक्सेस (MH 16 DQ 2055) ही स्कुटी तिसगाव बाजारतळ परिसरात उभी केली होती. वलीमाचा कार्यक्रम असल्याने ते जेवणासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री साडेदहा वाजता परत आल्यानंतर त्यांना आपली स्कुटी त्या ठिकाणी दिसून आली नाही. आजूबाजूला बराच शोध घेतला; मात्र वाहन सापडले नाही. अखेर आपली स्कुटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी शहर व तालुक्यात चोरी, दुचाकी चोरी, खिसेकापू व पॉकेटमारांच्या घटना वाढल्याचे चित्र दिसत आहे. घरासमोर उभ्या केलेल्या गाड्या चोरीला जाणे, गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू सक्रिय होणे यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त होत असून, रात्रीच्या गस्तीत वाढ, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, संशयितांवर कडक कारवाई करणे यासह तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
तिसगावसह पाथर्डी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वाहनांना लॉक, अलार्म व्यवस्था लावणे, अंधाऱ्या ठिकाणी वाहने न उभी करणे व संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवणे, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
