प्रतिनिधी सचिन दिनकर
अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर ही निवड पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे घुले अध्यक्ष झाल्याने बँकेवरील सत्ता भाजपकडून राष्ट्रवादीकडे गेल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. शिवाय सध्याच्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळही अधिक आहे.
दरम्यान, घुले यांच्या निवडीमागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे. संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी विखे यांच्याच पुढाकारातून एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. त्यामध्ये घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. फेब्रुवारी २०२६ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपणार असल्याने ही निवड भविष्यातील राजकारणासाठीही महत्त्वाची मानली जाते.
या समीकरणात आणखी एक राजकीय सूक्ष्म खेळी दडलेली आहे. राष्ट्रवादीकडून पारनेरचे प्रशांत गायकवाड हे अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. तर चंद्रशेखर घुले हे कोपरगावचे राष्ट्रवादी आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत. कोपरगावात काळे–कोल्हे–विखे यांच्यातील राजकीय द्वंद्व नव्या टप्प्यावर असताना विखे यांच्या पुढाकारातून घुले यांची निवड होणे, या घडामोडीला विशेष राजकीय वजन देणारे ठरते.
अध्यक्षपदी बिनविरोध निवडीनंतर चंद्रशेखर घुले यांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
