पाथर्डी_महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामविकासाला नवी दिशा देणारे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” पाथर्डी तालुक्यात दिनांक १७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे.

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अभियानाचा प्रारंभ होत असून ते ३१ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. तालुक्यातील एकूण १०८ ग्रामपंचायतींना या अभियानाचा समावेश करण्यात आला असून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना सुशासन, आर्थिक स्वावलंबन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सक्षम करणे हा आहे. विशेषतः पुढील गोष्टींवर भर दिला जाणार आहे: ✔ ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे ✔ गावे जलसमृद्ध, स्वच्छ व हरित करणे ✔ मनरेगा व इतर योजनांचे प्रभावी अभिसरण करणे ✔ गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे ✔ उपजीविका विकास व सामाजिक न्यायाला चालना देणे ✔ लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे
प्रशासनाने तालुका व ग्रामपंचायत स्तरावर नियोजन सुरू केले असून अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग घेऊन आदर्श ग्राम पंचायत निर्माण करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी आणि सनियंत्रण समिती कार्यरत राहणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मूल्यमापन समिती कार्यरत राहणार आहे.
उद्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अभियानाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रभारी गटविकास अधिकारी संगीता पालवे यांनी केले आहे. उद्घाटन सोहळ्यात स्थानिक आमदार राजळे ऑनलाईन मार्गदर्शन करणार असून मुख्यमंत्र्यांचेही मार्गदर्शन ग्रामस्थांपर्यंत पोहोचणार आहे.
अभियानाच्या अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आकर्षक पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत: 🏆 तालुकास्तर – प्रथम: ₹१५ लाख, द्वितीय: ₹१२ लाख, तृतीय: ₹८ लाख 🏆 जिल्हास्तर – प्रथम: ₹५० लाख, द्वितीय: ₹३० लाख, तृतीय: ₹२० लाख 🏆 विभागस्तर – प्रथम: ₹१ कोटी, द्वितीय: ₹८० लाख, तृतीय: ₹६० लाख 🏆 राज्यस्तर – प्रथम: ₹५ कोटी, द्वितीय: ₹३ कोटी, तृतीय: ₹२ कोटी
ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधावा, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. या अभियानातून गावागावांत विकासाची नवी चळवळ निर्माण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
