February 21, 2026

पाथर्डी_तालुक्यातील प्रसिद्ध मोहटा देवी देवस्थान येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि काटेकोर नियोजनाने पार पडणार आहे. राज्यभरातून लाखो भाविक या यात्रेसाठी येतात. त्यांचा सोयी-सुविधांचा विचार करून प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, वाहतूक, अन्न व सुरक्षा विभागांनी संयुक्तरीत्या तयारीला सुरुवात केली आहे.

येत्या २२ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव पार पडणार असून, त्यासाठी आवश्यक सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली. प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, वन विभागाचे अधिकारी अरुण साबळे, गटविकास अधिकारी संगीता पालवे, वाहतूक निरीक्षक गोवर्धन दहिफळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, सरपंच मनीषा पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात मुख्य म्हणजे पाथर्डी आणि मोहटा देवी गड परिसरात असलेली अनधिकृत अतिक्रमणे आठ दिवसांत हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक जागेवरील फ्लेक्स बोर्ड, आकडा टाकून घेतली जाणारी वीज, इतर विनापरवाना लावलेले साहित्य यावर कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त करून नवरात्र संपेपर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच भाविकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः पेढ्यांमध्ये रसायनिक पदार्थ व अन्य मिश्रण वापरून विक्री केली जाणारी भेसळ मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तातडीने नमुने तपासणी घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीसाठी भरारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यकर्ते ऍड. हरिहर गर्जे यांनी अशा भेसळीचे नमुने अधिकाऱ्यांपुढे सादर केले. याशिवाय मोहटा रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनपासून तनपुर वाडीपर्यंतच्या ८०० मीटर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश पंचायत समिती व नगरपालिका विभागाला देण्यात आले. एसटी महामंडळाने यात्रेच्या काळात १०० बसेस उपलब्ध करून दिल्या असून जुन्या बसस्थानकावर अहोरात्र नियंत्रण कक्ष सुरू राहील. नादुरुस्त बसेस त्वरित दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाला शहरातील व्यापाऱ्यांसोबत समन्वय साधून भगरी व इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासण्याची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आणि विविध नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा लक्षात घेता यात्रेच्या काळात वाढणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांकडून साध्या वेशातील महिला आणि पुरुष पथके तैनात केली जातील. खिसेकापू व साखळी चोरांपासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खाजगी पार्किंगच्या दरांबाबत जागामालकांशी चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार असून भाविकांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

तसेच मोहटा देवी गड परिसरात आणि पाथर्डी शहरातील अतिक्रमणे आढळल्यास कठोर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यात्रेच्या सुरक्षिततेसाठी जुन्या बसस्थानकावर सीसीटीव्ही बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना पोलीस चौकीसाठी हंगामी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच डीजे वापरण्यास बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर विशेष पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. मोहटा ग्रामपंचायत आणि पालिकेला या आदेशांचे पालन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

उघड्यावर मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली असून सार्वजनिक रस्त्यांवर मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या सर्व तयारीबाबत बोलताना प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सर्व यंत्रणांना व व्यावसायिकांना धार्मिक भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यात्रा पार पाडण्याचे आवाहन केले. त्यांनी विशेषतः प्रशासनातील कोणताही हलगर्जीपणा भाविकांना त्रासदायक ठरू नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करण्याची गरज अधोरेखित केली.

रस्ते, पथदिवे, बीएसएनएल सेवा, आरोग्य सुविधा यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करावे अशी सूचना त्यांनी केली. बैठकीच्या शेवटी देवस्थान समितीचे विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्व यंत्रणांनी सहकार्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

अशा प्रकारे यंदाचा मोहटा देवी शारदीय नवरात्रोत्सव पारंपारिक श्रद्धा, आधुनिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या सजगतेने उत्साहात आणि सुरक्षिततेने साजरा होणार आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!