February 18, 2026

पाथर्डी _ गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याच्या थेंबालाही वंचित राहिलेल्या पाथर्डीतील शासकीय धान्य गोडाऊन परिसरातील नागरिकांचा आज संयम अखेर सुटला.

तहानलेल्या जनतेने संतापाच्या भरात नगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन छेडले. या वेळी पालिकेचे कामकाज काही काळ ठप्प झाले, तर प्रशासनाशी नागरिकांची जोरदार शाब्दिक चकमकही उडाली.सततच्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठ्यासोबतच रस्त्यांच्या दुरवस्थेची आणि वीजपुरवठ्यातील अडचणींचीही कठोर शब्दांत पालिकेकडे तक्रार केली. “शहरातील इतर भागांप्रमाणे आमच्या भागातही वेळेवर पाणी आणि वीज मिळालीच पाहिजे, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारावं लागेल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

पाणीपुरवठा विभागाचे हरी पवार यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान चांगलीच शाब्दिक झटापट झाली. नागरिकांनी आपली असह्य नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला.

शेवटी नगररचनाकार नरेंद्र तेलोरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, जर ठोस उपाययोजना न झाल्यास रास्ता रोकोसह आणखी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी स्पष्टपणे दिला.

मोर्चामध्ये संदीप पवार, शिवाजी ढाकणे, शिवाजी दगडफैर, महेंद्र शिरसाठ, ज्योती पवार, रेणुका फुलशेटे, मीरा दहिफळे, ललिता सानप, अलका दगडफैर, शोभा आव्हाड, सुनीता बुधवंत, सविता विग्ने, मनीषा खेडकर, सोपान सानप, भगवान गोल्हार, सुधाकर खेडकर, बाबासाहेब बांगर, दिनकर झिंजुर्डे, दत्तोबा पवार, बाळासाहेब गीते यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!