February 21, 2026

पाथर्डी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या ओबीसी आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी तोंडोळी (ता. पाथर्डी) येथील उत्साही व कार्यतत्पर युवा कार्यकर्ते नानासाहेब पडळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या विचारधारेतून प्रेरित होत, ग्रामीण भागातील जनतेशी सतत जोडून काम करणाऱ्या या तरुण कार्यकर्त्यावर पक्षाने विश्वास दाखवत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे कोषाध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते पडळकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष इंजि. डी.आर. शेंडगे यांच्या सहीचे हे नियुक्तीपत्र स्वीकारताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष संघटनेत ज्येष्ठ नेत्यांबरोबरच नव्या दमाच्या तरुणांना संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात युवकांचे योगदान अनमोल आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, पदाची जबाबदारी सांभाळताना सर्वांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी कार्य केले पाहिजे.”

या प्रसंगी नव्याने तालुका अध्यक्षपदी निवड झालेले नानासाहेब पडळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा व ध्येयधोरणांना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सर्वसमावेशक विकासाची दृष्टी, कार्यशैली आणि सर्वसामान्यांविषयीची तळमळ युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू. पक्ष मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करीन.”

या नियुक्ती प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव फुंदे, तालुकाध्यक्ष रणजीत बेळगे, महिला अध्यक्ष मनिषा डांभे, तालुका सरचिटणीस श्रीकांत खेडकर, तसेच युवक नेते शुभम दहिफळे, अजित पालवे, कैलास दराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नानासाहेब पडळकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात पाथर्डी तालुक्यातील पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!