उपसंपादक सतिश मिरपगार
पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडोबा येथे आज ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक देवाण-घेवाण आणि व्यावहारिक जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून, त्याचाच एक भाग म्हणून बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे स्टॉल उभारले होते. फळे, खाद्यपदार्थ, स्टेशनरी साहित्य यांसारख्या वस्तूंची विक्री करत विद्यार्थ्यांनी आपले कला-कौशल्य, संवाद कौशल्य आणि व्यवहारिक ज्ञान दाखवले. चिमुकल्यांच्या या उपक्रमांनी उपस्थित पालकांचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

मुलांनी स्वतः बनवलेले पदार्थ व वस्तू खरेदी करण्यासाठी पालक व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.या कार्यक्रमासाठी गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, जेष्ठ विस्तार अधिकारी रामनाथ कराड, नवनिर्वाचित नगरसेवक बंडू बोरुडे, नवनिर्वाचित नगरसेविका वर्षाताई मोरे,साहेबराव वामन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा बालवे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी मेळावा पाहण्यासाठी जमली होती.

पुष्पा खेडकर : शाळेसाठी बोरवेलची मागणी
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका पुष्पा खेडकर यांनी शाळेच्या परिसराविषयी माहिती देताना सांगितले की, शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर असून बाग फुलवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे.मात्र पाण्याच्या अभावामुळे झाडांना पाणी देणे कठीण होत आहे. त्यामुळे शाळेसाठी तातडीने बोरवेल मंजूर करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

रामनाथ कराड : शिक्षकांच्या कार्याचे कौतुक
ज्येष्ठ विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी शिक्षकांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत सांगितले की, शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.या प्रयत्नांचे फलित म्हणून शाळेतील पटसंख्या वाढत असून विद्यार्थी तालुका स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश मिळले आहेत.

नवनिर्वाचित बंडू बोरुडे : बोरवेल व निधीबाबत आश्वासन
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक बंडू बोरुडे शाळेसाठी बोरवेल लवकरात लवकर मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.तसेच पालिकेच्या सभेत शाळेसाठी दहा लाख रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली व नवनिर्वाचित नगरसेवक अभय आव्हाड यांच्या सहकार्याने शाळेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादबाल आनंद मेळाव्यातील स्टॉल्सवर खरेदी करत पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.मुलांमध्ये लहानपणापासूनच व्यावसायिक दृष्टिकोन, आत्मविश्वास व व्यवहारिक ज्ञान रुजावे, या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.
यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पुष्पा खेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन गोटीराम शेळके यांनी करत आभार मंजुश्री लाटणे यांनी मांडले
