February 21, 2026

पाथर्डीत सोनसाखळी चोरांचा उच्छाद; पोलिसांचा धाक संपला, जनता असुरक्षितअवघ्या आठवड्यात चार घटना, आरोपी मोकाट; संतप्त लोकप्रतिनिधींची पोलीस ठाण्यावर धडक – ‘कारवाई नाही तर पाथर्डी बंद!’ असा इशारापाथर्डी तालुक्यात सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, भरदिवसा महिलांच्या व वृद्धांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अवघ्या एका आठवड्यात तालुक्यात चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याने पोलिस प्रशासनाचा धाक पूर्णतः संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चोरट्यांचा आत्मविश्वास वाढत असताना पोलीस मात्र ‘हातावर हात ठेवून’ बसल्याचा आरोप नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत.वसु जळगाव परिसरात वृद्ध नागरिकाच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याची घटना, मढी येथे भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटण्याचा प्रकार, तसेच आज पाथर्डी शहरातील साईनाथ नगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरट्यांचे निर्भय पलायन—या घटनांनी तालुक्यातील कायदा–सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवले आहे. नागरिकांमध्ये भीती इतकी वाढली आहे की महिलांनी दागिने घालून घराबाहेर पडणेही धोक्याचे वाटू लागले आहे.शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरी, लुटमार आणि रोड रोमिओंच्या दहशतीमुळे जनतेचा संयम सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्यासह सर्व नगरसेवकांनी थेट पाथर्डी पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरीक्षकांच्या दालनात ठाण मांडले. यावेळी संतप्त लोकप्रतिनिधींनी पोलिस प्रशासनाला जाब विचारत,“शहरात गुन्हेगार मोकाट फिरत असताना पोलीस नेमके काय करत आहेत?” असा थेट सवाल केला.यावेळी पोलीस निरीक्षकांनी अधिकारी व मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे करत आपली असहायता मांडली.

मात्र हे कारण उपस्थित लोकप्रतिनिधींनी सपशेल फेटाळून लावले.नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी संतप्त शब्दांत म्हटले,“मनुष्यबळ नाही हे कारण आम्हाला मान्य नाही. पोलीस जर गुन्हेगारांसोबतच फिरत असतील तर सामान्य माणसाने संरक्षणासाठी कुणाकडे पाहायचे? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच आहे.”लोकप्रतिनिधींनी शहरात बिनधास्त फिरणाऱ्या बिगर नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या दुचाकी-चारचाकींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सोनसाखळी चोरट्यांना त्वरित जेरबंद करून पोलिसी धाक निर्माण करावा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही देण्यात आला.“तात्काळ कारवाई झाली नाही तर पाथर्डी बंदचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा थेट इशारा नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिला.एकीकडे भरदिवसा नागरिकांच्या गळ्यातील दागिने लुटले जात असताना, दुसरीकडे पोलिस प्रशासनाची निष्क्रिय भूमिका पाहून पाथर्डीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता तरी पोलिस प्रशासन जागे होणार का, की चोरट्यांचे मनोबल आणखी वाढणार—असा सवाल संपूर्ण तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.या वेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक बंडू बोरुडे, नंदकुमार शेळके, डॉ. जगदीश मुने, बजरंग घोडके, मनिषा उदमले, सुभाष बोरुडे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

🔴 चौकट : –

महाविद्यालय परिसरात पोलिस गस्त वाढवा – डॉ. जगदीश मुने यांची मागणीशाळा व महाविद्यालये सुटताना आणि भरताना पोलिसांनी विशेष गस्त वाढवावी. रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा. तसेच शहरात मोकाट फिरणाऱ्या बिगर नंबर प्लेटच्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक डॉ. जगदीश मुने यांनी केली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!