उपसंपादक सतिश मिरपगार
पाथर्डी शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेली पाणीपुरवठा योजना व रस्त्यांची कामे गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत.

रखडलेल्या कामांमुळे शहरभर प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान बालके व वृद्ध नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, खोकला तसेच अॅलर्जीचा त्रास वाढत आहे. याशिवाय रस्ते खणलेले व खड्डेमय झाल्यामुळे छोटे-मोठे अपघात वाढले असून अनेक नागरिकांना मान, पाठ, कंबरदुखी तसेच मणक्याच्या विकारांचा त्रास जाणवू लागला आहे.शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर मातीचे ढिगारे, खणलेले खड्डे व अर्धवट सोडलेली कामे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. ठेकेदारांकडून “आठ दिवसांत काम पूर्ण करू” असे वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात महिनोन्महिने उलटूनही कामे पूर्ण झालेली नाहीत. घरासमोर साचलेली धूळ व वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी माती नागरिकांसाठी रोजचा त्रास ठरत आहे.मतदानाच्या काळात प्रभाग क्रमांक दोन येथील हरिजन वस्तीमध्ये पथदिवे बसवण्यात आले होते. मात्र मतमोजणीनंतर काही दिवसांतच त्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दीड महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत असतानाही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही प्रभागांमध्ये मात्र कामांना प्राधान्य दिले जात असून दलित वस्ती असलेल्या भागांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.मतदानाच्या काळात दिवसातून अनेक वेळा परिसरात फिरणारे नगरसेवक आता नागरिकांच्या अडचणी ऐकायला फिरकत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. “निवडणुकीपूर्वी आश्वासने दिली, मात्र आता आमच्याकडे कोणी फिरकत नाही,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय, अरुंद रस्त्यांवरून रात्री अपरात्री अवैध वाळू व इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून संबंधित विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून धुळीचा त्रासही वाढत आहे.सामाजिक कार्यकर्ते सचिन दिनकर यांनी संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून कॉंक्रिटीकरण करावे तसेच बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत, यासाठी एक महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने परिसरातील तरुण व महिलांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्यांचे काम पूर्ण करून पथदिवे सुरू न झाल्यास प्रभागातील महिला एकत्र येऊन पालिका प्रशासनावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.
