प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी शहर व तालुक्यात सांस्कृतिक चळवळ अधिक सशक्त होत समाजाचा बौद्धिक दृष्टिकोन अधिक प्रगल्भ व्हावा, यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरते.

विशेषतः साहित्य क्षेत्रातून महिलांची सांस्कृतिक व वैचारिक प्रगती साधण्यासाठी कर्जत तालुक्यात यशस्वी ठरलेला “कर्जत पॅटर्न” पाथर्डी तालुक्यातही राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट मत नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी व्यक्त केले.माळी बाभुळगाव येथे बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बबन चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, सुरेश कुटे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, उपसरपंच आकाश वारे, जैन विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी, रमेश भडके, संदीप वायकर, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत पाटील, रामनाथ कोलते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच प्रा. प्रदीप वारूळकर यांना पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.आपल्या भाषणात आव्हाड म्हणाले की, महाविद्यालयीन जीवन हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून व्यवहारज्ञान, संस्कृती, मूल्यशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचे चालते-बोलते विद्यापीठ असते. केवळ पुस्तकी ज्ञान जीवनासाठी पुरेसे ठरत नाही. संवाद कौशल्य, निरीक्षणशक्ती आणि सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मोबाईलच्या अति वापरापासून नव्या पिढीने दूर राहावे, अन्यथा होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचवणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.कर्जत तालुक्याने महिलांच्या साहित्य क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करत ते म्हणाले की, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना जगण्याचा नवा दृष्टिकोन देण्याचे काम त्या संमेलनातून झाले आहे. साहित्य, कला, संस्कृती, धर्म, माणुसकी आणि परोपकार या सर्व शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे घर असून त्या घराचा केंद्रबिंदू स्त्री असते. आज सर्वच क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर असून त्यांनी आपल्या बौद्धिक उंचीच्या जोरावर भारतीय संस्कृतीला नवे आयाम दिले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही समाजासाठी आशादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.लिहिते व्हा, वाचते व्हा आणि निर्भीडपणे बोलते व्हा, असा संदेश महिलांनी स्वीकारून साहित्याच्या माध्यमातून समाजजागृती, प्रगती आणि गतिमानतेसाठी नवे पाऊल उचलले आहे. त्यामुळेच कर्जत येथील साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित होते आणि तोच आदर्श पाथर्डीत राबवण्याचा आपला प्रयत्न असेल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा चेमटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पाशा पालवे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. माया पवार, प्रा. अनिल नारखेडे, प्रा. इंद्रजीत बोरले, प्रा. सलीम शेख यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय हे पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ महाविद्यालय पातळीवर स्वतंत्र एन.एस.एस. युनिट असणारे प्रमुख महाविद्यालय म्हणून ओळखले जाते, याचा सर्वच वक्त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या शिबिराच्या माध्यमातून आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, श्रमदान तसेच बौद्धिक उपक्रम राबवले जाणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
